⚜️भगवान परशुराम - भाग - ३⚜️
कामेष्टी यज्ञानंतर दोन महिन्यांनी एक दिवस ऋचिक म्हणाले, सती, मी निष्काम झालो, तपस्ये साठी वनांत जाण्यास तूं मला अनुमती द्यावीस. नाथ, आपण कां दोन आहोत? तुमची इच्छा तिच माझी!
गाधी राजांना वाईट वाटले, पण जावया बद्दल आदर होता. इश्वरेच्छा! विधिलिखित ठरलेले होते.
दोन्ही बाळं कलेकलेने आश्रमात वाढत होती. सत्यवतीचा मुलगा दोन मासाचा झाला तरी त्याचे पिता ऋचिकमुनी परत आले नाही म्हणून, अलिकडे सत्यवती उदास राहू लागली. तिची उदासी पाहून गाधीराजाने दोन ऋषीकुमारांना सत्यवतीला बाळ झाल्याचे व त्याच्या नामकरण विधीसाठी ऋचिकांना येण्याचे आमंत्रण देण्यासाठी त्यांचेकडे पाठविले होते.
आपली सखी हरवलेली बघून मनोरमा म्हणाली, अगऽ! सत्या, बाळ कधीचा रडत आहे? त्याला भूक लागली असेल. सत्यवतीने त्याला पदरा खाली घेतले. त्याचे मुखावलोकन करीत असतांना तिचे डोळे भरुन आलेले बघून जवळच असलेली मनोरमा म्हणाली, अगऽ, दुध पाजतांना रडू नये.दुध आटते. अशी सतत उदास नको राहूस. येतील की लवकरच. जवळ का आहेत? गौतमी गंगेकाठी कोटी तीर्थातील त्यांच्या आश्रमात पोहचणे व तिथून परत यायला त्या ऋषीकुमारांना कांही वेळ लागेल की नाही
येतीलच एवढ्यात. पटतेय गऽ! पण मन नाही ना मानत...
तेवढ्यात तिची माता अजीगा, छोट्या विश्वामित्राला घेऊन आली. सत्यवती आपल्या लहान भावाला बघून आनंदित झाली. म्हणाली, ये अम्ब! आण त्याला इकडे, मी घेते त्याला. माता अजीगाने मनोरमाला भाजी आणण्यास बाहेर पाठवले होते. ती कांही वेळातच सत्याऽऽ सत्याऽऽ ओरडत आली, म्हणाली, ते बघ ऋषीकुमार येत असलेले दिसताहेत आंत गाधीराजा ग्रंथवाचन करीत होते, त्यांच्याही कानी आवाज गेल्याने, तेही ग्रंथ मिटवून बाहेर आले.
येवढ्यात ऋषीकुमार येऊन पोहचले. मनोरमा त्यांना पाणी देत म्हणाली, सत्यवती तुमची अधिरतेने वाट बघत आहे. म्हणूनच आम्ही लवकर त्यांच्यासाठी शुभवार्ता आणली आहे. कोणती वार्ता? एक ऋषीकुमार म्हणाला, राजन् आपले जामात, तपस्वी महामुनी ऋचिक, गौतमी गंगेकाठी क्षेमकुशल असून, त्यांनी विनंती केली की, आपणच देवी सत्यवती व बाळाला घेऊन इकडेच यावे.नामसंस्कार तिथेच करु. इतका दीर्घ प्रवास केल्यास माझ्या तपस्येत खंड पडेल. सत्यवतीच्या चेहर्यावरचा आनंद बघून, राजा म्हणाले, ठीक आहे, परवा प्रतिपदेला प्रयान करु!
सोमरथने विचारले, कान्यकुब्जमधून रथ मागवायचा का? नको! सहा भोयांसह शिबिका सज्ज ठेवा. रथाचा बडेजाव नको. आश्रमजीवन पत्करले तर त्याप्रमाणेच रहायला हवे. दोन अश्व घे. सोमरथ तुम्ही माझेसोबत चलावे. रुण्वरथ इथे आश्रमात थांबेल.! मनोरमाने येण्याची इच्छा प्रगट केली पण तीला नकार दिल्याने ती डोळे पुसत आत निघून गेली.
माता अजीगा आणि मनोरमा पुढच्या दोन दिवसात सत्यवतीच्या तयारीत गुंतुन गेल्या. माता अजीगा, बराच लांबचा प्रवास असल्यामुळे सत्यवती ला सतत सूचना देत होती, बाळाला कोणते औषध कधी द्यायचे, घुटी कधी द्यायची इत्यादी. प्रवास होता, पर्वतांच्या दोन रांगा ओलांडून गौतमी गंगेपर्यंतचा पल्ला गाठायचा होता.अगऽ! अम्ब नको काळजी करु महामुनी ऋचिकांना अनेक दिव्यौषधींची माहिती आहे शिवाय वाटेत कितीतरी ऋषीमुनींची आश्रमे आहेत.
गौतमी गंगेच्या शांत, सात्विक परिसरात, सत्यवतीची शिबिका येऊन पोहचली. पाठोपाठ राजा गाधी व सोमरथांचे अश्वही आलेत. स्वागतासाठी स्वतः महामुनी ऋचिक सामोरे आलेत. आपली प्रिय पत्नी व गोंडस बाळाला बघून ऋचिकांना अतिशय आनंद झाला. राजा गाधीने महात्मा ऋचिकांनि प्रेमालिंगन दिले. सत्यवतीने बाळाला त्याच्या पित्याजवळ देऊन खाली वाकून तिने पतीला नमस्कार केला. आज ती खर्या अर्थाने स्वतःच्या हक्काच्या घरी, सासरी आली होती. आतां पुढचे पूर्ण जीवन तिथेच घालवायचे होते. उत्सुकतेने ती सर्व परिसर न्याहाळत होती.
आश्रमाची जागा भरपूर मोठी होती. मध्य भागी ऋचिकांची चांगली ऐसपैस गवताने शाकारलेली पर्णकुटी होती. पर्णकुटी समोर विस्तीर्ण अंगण गोमयने सारवलेले होते. आश्रमाच्या अन्य भागात ऋषीकुमारांच्या पर्णकुट्या होत्या. थोड्याच अंतरावर गोठ्यात दोन सवत्स धेनू होत्या. मोकळ्या भागात दोन हरणे आपल्या शावकासह बागडत होते, प्रकृतीने आपले सारे सौंदर्य मुक्तपणे उधळलेले बघून सत्यवती ला अतिव आनंद झाला, सुखावली. वास्तविक ती क्षत्रिय राजकन्या, पण लहानपणापासून आई वडिलां सोबत आश्रमात राहण्याची सवय असल्यामुळे राजैश्वर्याचा मोह तिला कधीच नव्हता. आता तर ती ऋषीपत्नी झाली होती. साधेपणे निसर्गाशी एकरुप होणे हाच तिचा आर्यधर्म होता.