⚜️सतराशे साठ⚜️
एखाद्या माणसामुळं आपलं एखादं काम अडलं तर आपण सहज म्हणतो,"अरे, दुसरा माणूस शोधा ना. मस्त सतराशे साठ सापडतील." हे सतराशे साठ म्हणजे भरपूर किंवा पुष्कळ. हा शब्द आला तो थेट पानिपतावरून. हा शब्द ही मराठी भाषेला पानिपतच्या तिसऱ्या युद्धाची देणगी. ही लढाई झाली सन सतराशे एकसष्टच्या संक्रांतीला. लढाईसाठी सर्व माणसं पुण्यात जमली ती सतराशे साठला. एकाच प्रकारच्या कामात कुशल असणारी भरपूर माणसे. त्यावरूनच लोक म्हणू लागले - एकाला शोधायला गेलात तर सतराशे साठ सापडतील. या युद्धात आपला पराभव झाला. मग आपण कुणाचाही पराभव झाला, की म्हणू लागलो, "त्याचं पानिपत झालं." हे दोन्ही शब्द म्हणजे पानिपताचीच आठवण.