⚜️भगवान परशुराम - भाग - ११⚜️

⚜️भगवान परशुराम - भाग - ११⚜️  

     परशुरामांनी त्या बालकाला त्याची माहिती। विचारल्यावर तो म्हणाला, मी शांतनामक मुनींचा पुत्र. तीर्थाटनासाठी निघालो. बद्रीकेद्बारकडे जातांना वाट चुकली. आता तुला भिण्याचे कारण नाही. व्याघ्रा कडून तुला इजा किंवा व्रण न झाल्यामुळे तुझे आज पासून 'अकृतव्रण' नाव राहिल. पिताश्री, पुढील आयुष्य तुमचा हा पुत्र तुमच्या सेवेत घालू इच्छितो. कृपया अनुज्ञा द्यावी. रामांनी त्याला ह्रदयाशी धरले. दोघेही दक्षिणेकडे चालू लागले.
     जनदग्नीच्या आश्रमात ते पहाटेच गंगेवर गेले होते.रेणूका एकटीच परशुरामच्या आठवणीने व्याकुळ झाली होती. त्यांना तिर्थयात्रेला जाऊन बरेच दिवस झाले होते. रुमण्वत (वसुसेन), सुषेणु, वसु व विश्वावसु चौघेही आश्रमीय जबाबदारी उत्तम सांभाळायचे. पण पांचवा पुत्र राम नसण्याची रुखरुख रेणूकाला नेहमीच जाणवायची. आज सकाळपासूनच तिला शुभ शकुन होत होते. तिला वाटले आज नक्की राम येईल.
     इतक्यात दोन ऋषीकुमार पळत येऊन म्हणाले, अम्ब! आश्रमात चार सैनिक घुसलेत.त्यांच्या पोशाखावरुन ते हैहय राजाचे सैनिक असावे असे वाटते. जा.. त्यांना सन्मानाने घेऊन या. आपला धर्म आपण विसरुं नये. इतक्यात दुसरा शिष्य धापा टाकत येऊन म्हणाला, अम्ब! नदीवरुन येणार्‍या चार भार्गवांना त्यांनी बांधून नेले. ती विचारात असतांनाच रुमण्वत व सुषेण आले व हैहय सैनिकांच्या प्रतिकारा साठी अनुज्ञा मागीतल्यावर, रेणूका म्हणाली, तो अधिकार तुमच्या पिताश्रींचा आहे. अम्ब! हे हैहय फारच उन्मत्त झाले. यांच्या छळाच्या वार्ता वाढतच आहे. पिताजींनी तर शांततेचा वसा उचलला आहे.मग यांचा निकाल कसा लागावा? लागेल..लागेल, रामला येऊ द्या. पांचही बंधू पितांजींशी चर्चा करुन निर्णय घ्या. तेवढ्यात छोटा आश्रमबालक पळत येऊन म्हणाला, दोन तरुण येतांना दिसले. रेणूका म्हणाली, नक्कीच राम आला. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले, परशुराम पुढे येऊन तिच्या चरणावर मस्तक ठेवून म्हणाले, अम्ब, हा तुझा सहावा पुत्र 'अकृतव्रण'. त्यानेही मातेला वाकून नमस्कार केला. ४-५ वर्षांनी आलेल्या आपल्या पुत्राकडे अनिमिष नेत्राने बघत होती. तारुण्यात आलेल्या आपल्या पुत्राचे पुरुषोत्तम रुप बघून रेणुकेचा उर भरुन आला. मातेला अकृतव्रण ची हकिकत सांगत असतांनाच जमदग्नी नदीवरुन आले. रामांनी त्यांचे चरणी मस्तक ठेवले. नंतरचे चार दिवस पिता पुत्रांच्या गप्पांना खंड नव्हता. परशुरामने यात्रेची, पूर्वजांच्या भेटीचे आणि महामुनी भृगुंच्या ग्रंथाबद्दल अखंड बोलत होते.
     जमदग्नींनी सर्वावर कामे सोपवली. परशुरामाकडे आश्रमात येणार्‍या अतिथींची सेवा व अतिथीपुजा, रुमण्वत सुषेणकडे कृषी, तर वसू, विश्ववसुकडे गाईचे चारापाणी, आश्रमाची स्वच्छता, पुजासाहित्य, समीधा गोळा करणे इ. कामे सोपवली.
रेणूका आश्रमात शिक्षणास येणार्‍या सर्वांची माता होऊन, अतिथी सत्काराबरोबर भोजन व्यवस्था व स्वास्थ्य होते. आणि जमदग्नी पुजेची अग्निहोत्र या सर्वाचे व्यवस्थापन पाहत. 
    सर्वावर सोपवलेली जबाबदारी प्रत्येकजण पार पाडीत होता. त्या दिवशी रेणूकामाता पाणी आणण्यासाठी नदीवर गेली असतां, गंधर्व राजा चित्ररथ आपल्या अनेक स्रीयांसह उत्तान कामक्रीडा करीत असला दिसला. दैवगती बघा कशी असते, आदर्श पतिव्रता म्हणून जिची कीर्ती त्रैलौक्यात होती, जिने स्वप्नातही परपुरुषाचे नांव ओठी येऊ दिले नाही, जिचे आपल्या पतीव्रता वस्रात भरलेले पाणी गळत किंवा झिरपत नव्हते, अशा त्या सतीला परपुरुषाचा श्रृंगार फक्त बघितल्यावर, आपणही आपल्या पती बरोबर असा श्रृंगार केला तर? असे नुसते विचार आले आणि वस्रातील पाणी गळून गेले, त्याक्षणी आपल्या पतिव्रतेत न्युनता आल्याचे लक्षात आले. ती अपराधबोध ग्रस्त होऊन, आपला सर्वज्ञ पती आता आपला नक्की त्याग करेल. नशीबाला बोल लावत, थरथरत, कापत आश्रमात परतली. तिची म्लान मुद्रा बघून जमदग्नीच्या लक्षात सारा प्रकार आला.संतापून धिक्कार करत म्हणाले, यापुढे या घराचे दरवाजे तुझ्या साठी बंद! जिथे तुला सौख्य वाटेल तिथे तू मौजमजा करायला जाऊ शकतेस.
    वास्तविक त्यांना आपल्या पत्नीच्या पातिव्रत्याचा कलंक पूर्णपणे पुसुन टाकायचा होता. तिच्या कल्याणासाठी रागाचा अविर्भाव धारण करणे भाग होते. जमदग्नी अत्यंत विरक्त, शांतस्थिरचित्त योगी होते. प्रसंगावश ते कधी क्रोधीत झाले तरी क्रोध पूर्णपणे त्यांच्या ताब्यात होता.