⚜️भगवान परशुराम - भाग - २⚜️

 ⚜️भगवान परशुराम - भाग - २⚜️

            वरुणदेव भार्गवांचे पुर्वज. त्यांनी ऋचिकांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देऊन ही कृपादृष्टी केली. ऋचिक सहस्र शामकर्ण अश्व घेऊन राजागाधीच्या आश्रमाकडे निघाले. पर्णकुटीबाहेर सडा घातलेल्या अंगणात मनोरमा रांगोळी घालत होती आणि जवळच्या कट्टया वर बसून सत्यवती बकुळपुष्पांची माला गुंफीत होती. दोघींमधे हासपरिहास सुरु होता, तेवढ्यात त्यांना घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. मनोरमा म्हणाली, अगं! मागील पोर्णिमेला भेटलेले ते ऋषी  एक मासाने येणार होते, ते तर येत नाही ना?तेवढ्यात एक तेजस्वी तरुण तपस्वी सहस्र श्वेतवर्ण शामकर्ण अश्वांचा थवा घेऊन आले. गाधीराजाने त्यांचे सुहास्य वदनाने सहर्ष स्वागत केले. अटीप्रमाणे ऋचिकऋषींनी
सहस्र शुभ्र शामकर्ण  अश्व आणलेले बघून,ऋषींच्या तपाला सामर्थ्याची जोड असल्याची राजाची खात्री पटली. राजा म्हणाले, भगवान् आपल्यासारखा महान तपस्वी मला जावई म्हणून लाभणार या परते दुसरे भाग्य ते कोणते? विवाहाची सिध्दता होईस्तोवर आपण या आश्रमातच वास्तव्य करावे.
           राजांनी मनोरमाला आवाज देऊन फलाहार आणायला सांगीतला.तीने फळांची परडी व एका तबकात बकुळफुलांची माळा आणले व म्हणाली,ही  बकुळमाला सत्यवतीने अतिथीसाठी केलाय. गाधी राजा अर्थपूर्ण गालात हसले.
              गाधीराजाने वानप्रस्थ स्विकारला असला तरी कन्येचा विवाह कान्यकुब्जमधे थाटाने व्हावे अशी जनतेची इच्छा होती. पण राजेंना ते रुचले नाही. विशेष म्हणजे सत्यवतीलाही डामडौलाची आवड नव्हती. त्यामुळे विवाह आश्रमात करण्याचे ठरले.
         दुसर्‍या दिवसापासून सेवकवर्ग कामाला लागले, ८-१० दिवसातच परिसराचे रुपच बदलले. आश्रमासमोर विस्तीर्ण,सुंदर, सुशोभित मांडव पडला. स्रीयांनी प्रवेशदारापुढे सुंदर रांगोळ्या रेखाटल्या. विवाहाचा दिवस उगवला. विवाहासाठी वरपक्षाचे वर्‍हाडी म्हणून देवगण! कुलपुरुष भृगुमुनी आले होते. विवाह साध्या पध्दतीने पण सुंदर रितीने पार पडला. गाधीराजाने आपली लाडकी कन्या सत्यवतीचे कन्या दान करुन ऋचिकांच्या स्वाधीन केले. भृगुमुनींना आपल्या सुंदर, सुशील सुनेला बघून अत्यंत आनंद झाला. सत्यवतीने सासर्‍यांना वाकून नमस्कार केला. तिला आशिर्वाद देत म्हणाले, मी प्रसन्न झालोय! तुला हवा तो वर माग!
      सत्यवती विनयाने म्हणाली, तात, स्रीजीवन पुत्रावाचून सफल होत नाही. तात मला बंधु नाही, माझ्या आईला सूर्यासारखा तेजस्वी, शूर, पराक्रमी पुत्र व्हावा. तथास्तु!
      मुली तूं प्रथम आईसाठी वर मागीतल्याने मी प्रसन्न झालोय. आर्य स्री स्वतःचा विचार कधीच करत नाही, ती परंपरा तूंं राखलीस. स्वतःसाठी कांही माग.
     खाली मान घालून विनम्रपणे म्हणाली, तात... कळले. तुझी मनोकामना पूर्ण होईल. ज्याप्रमाणे तुझ्या मातेला  महापराक्रमी, दुष्ट क्षत्रियांचा नाश करणारा, तेजस्वी, क्षात्रगुणसंपन्न पुत्र होईल. तसेच तुला भृगुकुलाला तेजोमय बनवून, भृगुकुलाचे नांव उज्वल करेल असा तेजस्वी पुत्र तुला प्राप्त होईल.
     आजपासून तुझ्या मातेने पिंपळाची व तूं औंदुबरची पुजा करावीस. दोघींचीही मनोकामना पूर्ण होईल. पण पुत्र कामेष्ठी यज्ञ करावा लागेल. पित्याच्या आज्ञेनुसार ऋचिकांनी सत्यवतीसह यथासांग पुत्रकामेष्ठी याग केला. यज्ञाचा प्रसाद किंवा चरु देतांना मात्र घोटाळा झाला. आईसाठी दिलेला प्रसाद सत्यवतीने व सत्यवतसाठी दिलेला प्रसाद आईने खाल्ला.भृगुमुनींनी अंतर्ज्ञानाने कळल्याबरोबर त्वरेने तिथे येऊन म्हणाले! हे काय केलेत? प्रसादाची अदलाबदली झाल्यामुळे पुत्रांचीही अदलाबदली झाली. सुनबाई तुझ्या पोटी  महा शूर क्षत्रिय व तुझ्या आईच्या पोटी ब्रम्हर्षी येतील.
         हे ऐकून सत्यवती अतिशय दुःखी झाली. विप्रपत्नी होऊन पोटी क्षत्रिय यावा हे तिच्या मनाला सहन होईना. विकल स्वरात म्हणाली, मांमजी, मला तुमच्यासारखा सुज्ञ, सर्वमान्य, सर्वज्ञानी, ब्राम्हणपुत्रच हवा! भृगुंनी तीला परोपरीने समजावले पण ती आपल्या हट्टावर कायम राहिली. शेवटी त्यांनी मंत्र फिरवला व म्हणाले, तुला होणारा पुत्र ब्राम्हण झाला तरी नातू मात्र क्षत्रियच होईल आणि तुझ्या आईच्या पोटी ब्रम्हर्षी येईल.
        यथावकाश मायलेकीला पुत्ररत्न प्राप्त झाले. गाधीराजाने राजपुरोहित आणि राजज्योतीष्या ला बोलावले. त्यांनी दोन्ही बालकांचे जातक (भविष्य) वर्तवले. ही दोन्ही मुले ऋषी होतील. सत्यवतीच्या मुलाचे नाव जमदग्नी ठेवावे. हा अत्यंत बुध्दीमान म्हणून सर्वत्र प्रसिध्द होईल. याचा जन्म क्षत्रिय कुशीत झाला तरी, यज्ञाच्या प्रसादी संस्काराने ब्रम्हण्याचे संस्कार दृढ होतील. ब्राम्हण म्हणवून घेण्यासाठी विश्वमित्रांनी साठ हजार वर्षे तपश्चर्या करुन ब्रम्हर्षीवर्त मिळवले ही गोष्ट प्रसिध्द आहे.