⚜️पाऊल व पाय⚜️

⚜️पाऊल व पाय⚜️

       पाऊल व पाय दोन्ही शब्द चटकन् बघितलं तर ऐकायला व दिसायला एकच वाटतात; पण त्यांचे संदर्भ खूप वेगळे असू शकतात..
  • पाऊल नाजूक ..व मुलायम..तर पाय भक्कम अन् मजबूत असावा लागतो.
  • पाऊलखुणा उमटतात तर पायांचे ठसे .
  • पाऊलवाटेवर कोणाची साथ मिळेलच याची खात्री नसते; पण पायवाट ही अनेकांच्या चालण्यामुळे बनते.
  • पाऊल जपून टाकायचे असते; पण पाय हा रोवायचा असतो.
  • काय कमाल आहे बघा..नावडत्या व्यक्तीच्या घरी "कधी पाऊलसुद्धा टाकणार नाही" असे म्हणतो; पण आवडत्या माणसाच्या घरातून मात्र आपला पाय लवकर निघत नाही.
  • नको त्या ठिकाणी पाऊल घसरते तर बहारदार संगीत मैफिलीत पाय रेंगाळत राहतो.
  • पाऊल वाकडे पडले तर पायांचा मार्ग व दिशा चुकते.
  • जीवनात किंवा  व्यवसायात टाकलेले पहिले पाऊल हा एक कौतुकाचा विषय बनतो तर येणार्‍या अनुभवांमुळे आयुष्यभर कधी स्वतःसाठी वा इतरांसाठी केलेली पायपीट* ही अटळ व गरजेची असते.
  • बऱ्याचदा विरोधी अर्थाने हे दोन्ही शब्द आपण वापरत असलो तरीही.. जन्माला येताना स्वतःच्या पावलांनी न येणारे आपण, ...परत जातानादेखील आपल्या पायांनी मात्र जात नाही एवढंच काय ते दोघांत साम्य आहे.