⚜️भूत आणि गाढव⚜️
एका कुंभाराने आपले गाढव दोरीने खुंट्याला बांधून ठेवले होते. रात्री एका भूताने दोरी कापून गाढवाला मोकळे केले.
त्या गाढवाने एका शेतकऱ्याच्या शेतातील ज्वारीचे पीक नष्ट करून टाकले. हे पाहून चिडलेल्या शेतकऱ्याच्या बायकोने भला मोठा दगड घालून गाढवाला ठार केले.
गाढव मेल्यामुळे कुंभार उध्वस्त झाला. प्रत्युत्तरादाखल कुंभाराने त्याच दगडाने शेतकऱ्याच्या बायकोची हत्या केली.
बायकोच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने कुऱ्हाडीचे सपासप वार करून कुंभाराचं डोकं धडावेगळे केलं. कुंभार मेल्याचे बघून कुंभाराच्या बायको व मुलाने शेतकऱ्याच्या घराला आग लावली.
हे पाहून क्रोधीत झालेल्या शेतकऱ्याने कुऱ्हाडीचे घाव घालून कुंभाराच्या बायको व मुलाला ठार केले... शेवटी जेव्हा शेतकऱ्याला पश्चात्ताप झाला तेव्हा तो त्या भूताला म्हणाला, "तुझ्यामुळे माझी पत्नी, कुंभार, कुंभाराची बायको व मुलगा मेले अन् माझ्या घराची राखरांगोळी झाली. तू असं का केलंस ?"
त्यावर भूताने शांतपणे उत्तर दिले... "मी कुणालाही ठार केले नाही, मी फक्त 'दोरीने बांधलेले गाढव' सोडले."
तात्पर्य :- आज माध्यमं (WhatsApp, Facebook, Instagram, Twitter, Print Media, News Channel etc.) भूतासारखी झाली आहेत. ते रोज नवनवीन गाढवांच्या दोऱ्या सोडतात आणि लोकं कसलाही विचार न करता, सत्यासत्यता न पडताळता उलट - सुलट प्रतिक्रिया देतात आणि एकमेकांशी भांडतात, एकमेकांची मने दुखावतात. माध्यमं मात्र तमाशा घडवून आणतात आणि बक्कळ पैसा कमावतात...