⚜️रद्दी.............!⚜️
एक चीनी महिला चुई दररोज गल्लीबोळातून फिरत रद्दी विकत घ्यायचा व्यवसाय करीत असते. एके दिवशी एक चीनी गृहिणी रद्दी विकताना बरीच घासाघीस करते. चुई भाव वाढवून द्यायला तयार होते. हातगाडीवरील तराजू आणण्यासाठी चुई रस्त्यावर येते आणि त्या गृहिणीच्या मनात पाप येते. ती रद्दीच्या गठ्यात एक जाडजूड विट बेमालुमपणे सरकवून देते. रद्दीचा गठ्ठा विस्कटून न बघताच चुई त्याचे वजन करते आणि पैसे देऊन गठ्ठा घेऊन जाते.
संध्याकाळी नवरा घरी येतो तेव्हा बायको नटूनथटून तयार झालेली असते. नवर्याला म्हणते, आटपा लवकर, आज आपण सिनेमाला जाऊ आणि बाहेरच जेवण करुन येऊ. नवरा म्हणतो, माझ्याकडे पैसे नाहीत, पुढच्या आठवड्यात बघू. बायको म्हणते, माझ्याकडे आहेत पैसे! आज मी घरातली सगळी रद्दी विकली! नवरा लगबगीने आपल्या खोलीत जातो. बरीच शोधाशोध करतो आणि त्रासिक चेहर्याने बायकोवर खेकसतो, टेबलावर माझा एक जाडजूड लिफाफा होता, तो कुठाय? तू घेतलास का? बायको म्हणते, तो होय? मी रद्दीत विकून टाकला! नवरा मटकन खाली बसतो. काय केलंस तू हे? अगं, गेल्या काही महिन्यात टेबलाखालून घेतलेले पंधरा लाख होते त्यात?
आपल्या घरी रद्दीची वर्गवारी करीत असताना कागदात गुंडाळलेली विट चुईच्या नजरेस पडते. क्षूद्र स्वार्थासाठी लोक किती खालच्या पायरीवर घसरतात, हे बघून ती दुःखी-कष्टी होते. विट बाजुला ठेवते आणि कामाला लागते. तो लिफाफाही तिच्या हाती लागतो. आत पंधरा लाखाच्या कोर्या करकरीत नोटा! ती बघतच राहते. ती नोटा लिफाफ्यात होत्या तशा परत घालून, लिफाफा विटेवर ठेऊन शांतपणे झोपी जाते.
इकडे त्या नवराबायकोला रात्रभर झोप येत नाही. एकमेकांवर खेकसाखेकशी होते. सकाळ होताच त्या रद्दीवालीला शोधून काढले पाहिजे. रद्दीवालीच ती! रद्दीत एक लिफाफा मिळाला आणि त्यात पंधरा लाख मिळाले, हे ती कबूल करील का? त्यातली काही रक्कम तिने खर्च तर केली नसेल ना? पोलिसात तक्रार केली असेल का? पोलिसाचे नाव काढताच बायकोच्या पोटातही गोळा येतो. हरामाचा पैसा बुध्दी भ्रष्ट करतो म्हणतात! झोप कशी येणार?
दुसर्या दिवशी चुई नेहमीप्रमाणे, रद्दी विकत घेणार, उचित दाम देणार, असा पुकारा करत रस्त्यावरुन जात असते. नवरा धावत पळत जाऊन चुईला गाठतो. म्हणतो, काल तू माझ्या बायकोकडून रद्दी घेऊन गेलीस? त्यात तुला एक जाडसर लिफाफा मिळाला का? तुझ्यासाठी तो रद्दीचा भाग असला, तरी माझ्यासाठी तो लिफाफा फार महत्वाचा आहे. चुई त्याला आपादमस्तक न्याहळते. थोडीफार चौकशी करुन लिफाफा त्याच्या हातात ठेवते. तो नोटा मोजून बघतो आणि त्यातली एक नोट चुईला देऊ करतो. चुई त्याला नम्रपणे नकार देते आणि हातगाडी ढकलत पुढे निघून जाते.
नवरा-बायकोच्या आनंदाला उधाण येते. नवरा म्हणतो, नाही तरी माझे हे पंधरा लाख गेलेच होते, घे तुला शाॅपिंगला! रद्दीवाली खरंच बावळट आहे. आयुष्यभर पायपीट करुनही तिला पंधरा लाख मिळायचे नाहीत. ती खोटं बोलली असती, तर मी काय करु शकलो असतो? चोरीचा मामला! बायको म्हणते, अहो, मी पण तुमचीच बायको आहे म्हटलं! कमी समजू नका मला? त्या रद्दीवालीशी आधी घासाघीस करुन भाव वाढवून घेतला आणि नंतर रद्दीत विट सरकवून दहा किलोचे पैसेही लाटले! आहात कुठे? रद्दीवाली खरंच बावळट आहे!
नवरा-बायकोचे संभाषण ऐकत दाराआड उभी असलेली चुई म्हणते, ही घ्या तुमची विट. काल रद्दीत चुकून आली माझ्याकडे! रद्दीच्या व्यवसायात मी माझ्या आयुष्यभरात पंधरा लाख मिळवू शकेन की नाही, मला माहीत नाही, पण प्रामाणिकपणे जे काही मिळविते, त्यावर मी आयकरही भरते! दिवसभर रद्दी गोळा करत फिरते आणि रात्री शांतपणे झोपी जाते, कारण मी स्वतःला कधीच फसवत नाही! मी समाधानी आहे. तुमच्या घरातली रद्दी बाहेर काढण्यासाठी मला केव्हाही बोलवा. तुमच्या मनातली रद्दी मात्र तुम्हालाच बाहेर काढून फेकून द्यावी लागेल! कारण, ती विकत घेऊ शकत नाही आणि कुणी फुकटही घेणार नाही!
⚜️संकलन⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरेबाजार
ता. जि. अहिल्यानगर