⚜️खजिना⚜️

⚜️खजिना⚜️ 

कुठं गेलं चुलीचं धुराडं
अन कोंबड्याचं खूराडं//१//

दुर्मिळ झाली पुरणाची पोळी
अन हुलग्याची शेंगोळी//२//

मिळतय का प्यायला माडगं? 
गेलं कुठं जनावरांचं वाडगं? //३//

गाडगं तर लोपच पावलं
ऊखळ मुसळ केरात गेलं//४//

किती पौष्टिक होती राळ्याची खीर
आणि रुखवातातील सारनाची पुरी//५//

कधी गायब झालं घरातलं जातं
लाकडी नांगर, शिवळाटीचं पातं//६//

आता सांगा बांधील का कोणी
गाडीची साकन, औताचं यठण//७//

गेला कुठं पायातला तोढा
अन् ऊधळणारा घोडा //८//

कुठं गेली वावरातली पंगत
 पत्रावळीच्या जेवणाची रंगत//९//

खरोखर विहिरीतच बुडाली
ना पाणी शेंदन्याची बादली//१०//

कसं शोधायचं झऱ्याचं पाणी
आणि पाखरांची मंजूळ गाणी//११//

लोप पावली नऊवारी साडी
अन् मांजरपाट धोतराची जोडी//१२//

गायब झाला हा सारा ऐना
 त्यामुळेच झाली माणसाची दैना//१३//

खरच हरवलं जात्याचं पीठ
अन पांढऱ्या खड्याचं मीठ//१४//

गव्हाच्या लापशीचा वास कुठं गेला
खरच हा खजिना कोणी लुटून नेला? //१५//