⚜️नियती⚜️

 ⚜️नियती⚜️ 

   एकदा यम वैकुंठात भगवंत विष्णुला भेटायला गेला. वैकुंठाच्या दारा जवळ ७ कबुतरं होते. त्यातील एका कबुतरावर यमाची दृष्टी गेली. ते कबुतर खुप घाबरलं. आता आपण मरणार या विचाराने त्याला काही सुचेना. इकडे गरुडाने वैकुंठाचं दार उघडुन यमाला आत घेतलं. यम विष्णुला भेटायला गेला. ज्या कबुतरावर यमाची दृष्टी पडली त्याने गरुडाला बघितलं व बाहेर बोलवुन गरुडाला विनंती केली. " मला इथुन घेऊन जा साता समुद्रापार, कारण यमाची माझ्यावर दृष्टी पडली आहे व तो बाहेर आला वैकुंठातुन कि मला घेऊन जाईल. मला घेऊन चल." गरुडाला हि त्याची दया आली. गरुडाने मग कबुतराला सातासमुद्रापार एका गुहेत नेऊन सोडलं जिथे सुर्याची किरणे पण पोचत नव्हती. ती गुहा दलदलीनी भरलेली होती. 
   इकडे यम विष्णुशी बोलुन वैकुंठाच्या दारात आले. त्यानी बघितलं जाताना तर सात कबुतरं होते, आता सहाच कशी काय? एक कबुतर कुठे गेलं. मग यमानी गरुडाला विचारलं. गरुड म्हणाला, "तुमची दृष्टी त्या कबुतरावर पडली. ते कबुतर म्हणालं मला सातासमुद्रापार सोड, मी सोडुन आलो."
   ज्या गुहेत गरुडानी कबुतराला सोडलं तिथे जागा कोंदटलेली असल्यामुळे व प्राणवायु नसल्यामुळे त्याचे प्राण गेले.
यम गरुडाला म्हणाला, "मी विष्णुदेवाला हेच विचारायला आलो होतो कि हे कबुतर तर इथे आहे व त्याचा प्राण तर सातासमुद्रापार जाणार असं विधीलिखित आहे. कसं करायचं ?"  पण बघा त्याचा प्राण तिथेच जाणार होता म्हणुन त्याला तशी बुध्दी झाली सातासमुद्रापार जायची व त्याचा जीव घुसमटुन घुसमटुन गेला.
तात्पर्य:- तुमच्या नशिबात नियतीने जे लिहिले तसेच होणार. आपण त्यात कुठला हि हस्तक्षेप करु शकत नाही. असे जरी असले तरी पण जर आपण सदगुरुंचीसेवा व भक्ती केली तर आपलं प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे.