⚜️अविचार...⚜️

⚜️अविचार...⚜️

   एके दिवशी एकाएकी भयंकर हिमवृष्टी होऊ लागली, म्हणून एका धनगराने रानात चरायला नेलेली आपली मेंढरे डोंगरातील एका गुहेकडे नेली. पण गुहेत शिरून पहातो तर त्या गुहेतील सर्व जागा धिप्पाड व दणकट अशा पाचपन्नास रानमेंढारांनी अगोदरच पूर्णपणे व्यापून टाकलेली. त्याने विचार केला, "ही रानमेंढरे आयती गुहेत सापडली आहेत. आपल्या मेंढारांना घालण्यासाठी आणलेल्या गवताच्या गुंड्या जर आपण या रानमेंढारांना खायला घातल्या तर यांना आपल्याबद्दल आपुलकी वाटू लागून ही आपल्याबरोबर आपल्या मेंढवाड्यात येतील." असा विचार येताच त्याने गुहेबाहेर हिमवृष्टीत उभ्या असलेल्या आपल्या पाळीव मेंढयांकडे दुर्लक्ष करून आपल्या जवळचा सर्वच्या सर्व हिरवागार चारा त्या रानमेंढारांना खायला घातला.
    हिमवृष्टी संपताच तो धनगर जेव्हा गुहेबाहेर पडला तेव्हा आपली सारी पाळीव मेंढरे भुकेने व थंडीने मरून गेल्याचे त्याला आढळुन आले. त्यामुळे जरी त्याला वाईट वाटले, तरी त्यांच्या बदली आता आपल्याला चांगली दणकट अशी रानमेंढरे मिळतील," या विचाराने त्याचे ते दु:ख बरेच कमी झाले. मग त्याने त्या रानमेंढरांचा कळप आपल्या मेंढवाड्याकडे नेण्यासाठी त्या गुहेतून बाहेर काढला, पण बाहेर पडताच तो सर्व कळपच्या कळप त्याला न जुमानता रानात पळून गेला. अशा रीतीने अविचारामुळे त्या धनगराची पाळीव मेंढरे मरून गेली आणि रानमेंढरे पळून गेली.
बोध:- जी माणसे नव्यांना जोडण्यासाठी जुन्यांना सोडतात, ती त्या दोघांनाही अंतरतात.