⚜️बायकोचे नातेवाई⚜️

⚜️बायकोचे नातेवाई⚜️
👬👭👭👫

 
      बायकोचे नातेवाईक ही मंडळी केवळ पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतवर्षात थोड्या बहुत प्रमाणात सारखीच.
     लग्न जमवताना माझी मुलगी खूप हुशार आहे, उत्तम स्वयंपाक करते असे सांगणारी मुलीची आई, मुलीच्या लग्नानंतर मात्र तीला काहीच येत नाही अशा जाणून बुजून केलेल्या समजुतीने मुलीच्या संसारात उगीचच ढवळाढवळ करते. 
     आजकाल मोबाईलच्या अनलिमिटेड पॅकमुळे आणि व्हॅाट्सअॅपच्या फ्री व्हिडिओ कॅालमुळे ही समस्या अतिगंभीर झाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
    बायकोचा भाऊ, म्हणजे तिचा वीक पॉईंट आणि बहुतांश नवरे मंडळींचा छळ होण्याचे मुख्य कारण. त्यामुळे तो न आलेला आणि आल्यास लवकर परत गेलेला ऊत्तम, पण हा योग फारच दुर्मिळ असतो.
      बायकोचे वडील हा प्राणी तसा बहुतांशी निरुपद्रवी, बऱ्यापैकी समजुतदार आणि वेळोवेळी जावयाची बाजू घेणारा. त्यांच्या सासूबाईंनी सतत केलेल्या जाचाला कंटाळलेला आणि म्हणूनच आपल्या बायकोने आपल्या मुलीच्या संसारात ढवळाढवळ करू नये असे मनापासून वाटणारा.
      बायकोची बहीण ही तशी सगळ्यांना प्रिय. जीजुची बाजू घेत, कधी कधी जीजीलाही फटकावणारी. सुंदर आणि अविवाहित असल्यास विशेष आवडणारी. 
     दूरची आत्या, दूरची मामी या जर रेल्वेने किंवा विमानाने येणार असल्या आणि विशेषतः येण्याची वेळ मध्यरात्रीची असेल तर त्या बायकोच्या खूप जवळच्या होतात. आणायला जाताना नाईलाज म्हणून जाणारा नवरा त्यांना सोडायला जाताना मात्र खुश असतो. बऱ्याचदा ट्रेनच्या किंवा विमानाच्या बराच वेळ आधी त्यांना सोडण्यासाठी तो उत्सुक असतो आणि त्यासाठी तो बिझी शेड्युल मधून आनंदाने सवडही काढतो.
     याच आत्याबाई किंवा मामींच्या गावी ज्यावेळी जाण्याचा प्रसंग येतो त्यावेळी बायको म्हणते, त्या खूप दूरच्या आहेत त्यांच्याकडे मुक्कामाला कसे जायचे? त्यापेक्षा छानशा हॅाटेलमध्ये राहू या.
     कोण जवळचा आणि कोण दूरचा हे ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार हा बायकोचाच असतो. त्यातल्या त्यात, बायकोच्या मैत्रिणी ह्या जास्त जवळच्या, प्रेमळ आणि हव्याहव्याशा वाटणाऱ्या. त्यांच्या येण्याने आणि विशेषतः मुक्कामाने बायकोला नव्हे पण नवरोबांना आनंद होतो. पण हा आनंद मिळू न देण्याची पुर्ण खबरदारी बायको सदैव घेत असते.
 
शेवटी बायको ती बायकोच असते. आपली आवडत नसली तरी, शेजाऱ्याची मात्र हमखास आ.. व.. ड..ते!

(संपूर्णतः काल्पनिक)
दिलीप कजगांवकर, पुणे