⚜️क्षमा⚜️
एका शेठजींनी आपल्या जावयास व्यवसायासाठी ३ लाख रुपये दिले होते. जावयाचा व्यापारात चांगला जम बसला. परंतु त्याने सासऱ्यांनी दिलेले ३ लाख परत केले नाही...
या गोष्टी वरुन दोघांमध्ये भांडण झाले. भांडण एवढं टोकाला पोहचले की दोघांनी एकमेकांकडे जाणे,बघणं एकदम बंद केले. घृणा व द्वेष हे आंतरीक संबंध खूप खोल असतात. शेठजी येणाऱ्या जाणाऱ्या नातेवाईकांकडे आपल्या जावयाची बदनामी करत.
शेठजी एक चांगले साधक होते. परंतु या गोष्टी मुळे त्यांच्या साधनेत व्यत्यय येऊ लागला. ध्यान करताना त्यांना जावयाची चिंता लागून राहायची. मनावर चिंतेचा व्यर्थ ताण पडू लागला. त्यामुळे बेचैनी वाढून ते असमाधानी राहू लागले. शेवटी ते एकदा गुरूंच्या भेटीला गेले आणि त्यांना आपली सर्व व्यथा सांगितली.
गुरू त्याला म्हणाले की "मुला तू चिंता करू नकोस, परमेश्वर कृपेने सर्व ठिक होईल. तू काही फळे व मिठाई घेऊन जावया कडे जा आणि तो भेटताच एवढं बोल मुला माझं चुकलं,मला क्षमा कर..."
शेठजी म्हणाले, "गुरुदेव, मी त्याला मदत केली आणि मीच त्याची "क्षमा" पण मागू?"
गुरुदेवांनी नी उत्तर दिले, "कुटूंबात असा कोणताही संघर्ष नाही की ज्यात दोन्ही बाजूंनी चुका होत नाही.जरी एका बाजूने १% ची चूक असली तरी दुस-या बाजूला ती ९९% असते. परंतु चूक ही दोघांचीही असते." हे ऐकल्यावर शेठजीला काही समजलं नाही. ते म्हणाले "गुरुदेव पण माझं काय चुकलं ?"
गुरुदेव म्हणाले "मुला तू मनातल्या मनात जावयाला वाईट समजलास ही तुझी पहिली चुक ... तू त्याची प्रत्येकाकडे निंदा- नालस्ती करत होता ही तुझी दुसरी चूक... रागीट नजरेने त्याला पहात राहिलास ही तुझी तिसरी चूक...तसेच स्वतःच केलेली निंदा तू तुझ्या कानाने ऐकत राहिलास ही तुझी चौथी चूक...
तसेच जावयाप्रती तुझ्या हृदयात अति राग व तिरस्कार ठेवला ही तुझी शेवटची चूक .... तुझ्या या चुकांमुळे तू जावयाला दु:ख तर दिलेस पण ते दु:ख किती तरी पटीने तुझ्याकडे फिरून आले. या तुझ्या चुकांमुळे तू त्याची "क्षमा" माग. नाही तर तुला शांतता लाभणार नाही. क्षमा मागणे ही खूप मोठी साधना आहे आणि तू तर एक चांगला साधक आहेस...."
हे सर्व ऐकून शेठजींचे डोळे उघडले. ते गुरुदेवांना नमस्कार करून जावयाच्या घरी गेले. तिथे सर्व लोक जेवणाच्या गडबडीत होते. शेठजींनी दरवाजा वाजवला. दरवाजा त्यांच्या नातवाने उघडला. आजोबांना बघून तो आश्चर्याने त्यांच्या कडे पहात आनंदाने ओरडू लागला. "आई,बाबा बघा कोण आलंय ते,आजोबा आले आहेत."
मुलीने व जावयाने दरवाजाकडे बघितले व विचार करु लागले की आपण स्वप्न तर पहात नाही ना? मुलगी आनंदी झाली. १५ वर्षांनी तिचे वडील घरी आले होते. ती त्यांना जाऊन भेटली. कंठ दाटून आल्याने काही बोलू शकली नाही. शेठजीने फळ व मिठाई टेबलावर ठेवली आणि दोन्ही हात जोडून जावयाला म्हणाले "मुला, सर्व चूक माझी आहे. मला क्षमा कर." "क्षमा" शब्द उच्चारताच त्यांच्या हृदयातून प्रेमाश्रु वाहू लागले. जावई त्यांच्या पायावर डोकं ठेवून आपल्या चुकीची रडून क्षमा मागू लागला. शेठजींचे अश्रू त्याच्या पाठीवर तर जावयाचे पश्चात्तापाचे व प्रेमाचे अश्रू त्यांच्या चरणांवर पडू लागले.
वडिल आपल्या मुलीची व मुलगी आपल्या वडिलांची क्षमा मागत होते. क्षमा व प्रेमाचा अथांग सागर फुटला. सर्व जण शांत,स्तब्ध,अश्रू भरीत अवस्थेत थोडा वेळ होते. जावई उठले व त्यांनी आतून सर्व रूपये आणून सासऱ्यांच्या समोर ठेवले.
सासरे त्याला म्हणाले "मुला, आज मी हे घ्यायला नाही आलो. मी माझी चुक सुधारण्यासाठी आलो होतो. माझ्या साधनेला जिवंत करण्यासाठी आणि मनातून द्वेषाचा नाश करण्यासाठी प्रेमाची गंगा वाहवण्या करीता आलो. माझं येणं सफल झाले. माझं दुःख मिटले. मला खूप आनंद झाला आहे."
जावई त्यांना बोलला बाबा तुम्ही जर हे पैसे नाही घेतले तर माझ्या हृदयातील आग विझणार नाही. कृपया तुम्ही हे पैसे ठेवा. शेठजींनी ते पैसे घेऊन आपल्या मर्जीने मुलीला व नातवांना वाटले. सर्व जण आनंदाने गाडीत बसून घरी आले...
१५ वर्षांनंतर त्या रात्री जेव्हा आई-मुलगी, भाऊ-बहीण, नणंद-वहिनी व सर्व मुले आपापसात भेटली तर जणू प्रेम नवीन शरीर धारण करून तिथे भेटत होते, सर्व कुटुंब अथांग प्रेम सागरात मस्त होते.
एका क्षमा या शब्दाने शेठजींचे सर्व दु:ख, चिंता, ताण, भिती, निराशा, मानसिक रोग मुळा पासून संपले आणि त्यांची साधना परत जीवंत झाली.....
बोध:- आपण सुद्धा आपल्या हृदयात क्षमा ठेवली पाहिजे. कुणीही छोटा, मोठा असो त्याच्या समोर आपण चुकीचे असलो तर क्षमा मागून सर्व भांडणे संपवून टाकावी हेच जीवनाचे संतुलन आहे......! चूक झाली नसली तरी ही क्षमा मागितली. ती एक साधना आहे......!