⚜️खरा आनंद⚜️

⚜️खरा आनंद⚜️

    शाळेत एके दिवशी शिक्षिकेने मुलांना सांगितलं, “आज आपण एका मुलाला नवीन बूट देणार आहोत. पण कोणाला द्यायचे हे ठरवणं माझ्यासाठी कठीण आहे. म्हणून आपण लॉटरी काढूया. ज्याचं नाव येईल त्याला हे बूट मिळतील.”
  सर्व मुलांनी आनंदाने आपल्या-आपल्या नावाचे छोटे कागद लिहून डब्यात टाकले. शिक्षिकेने त्या कागदांचे तुकडे व्यवस्थित मिसळले आणि सगळ्या मुलांसमोर एक कागद उचलला.
कागद उघडताच त्यावर लिहिलं होतं, “अजय”.
   सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या.अजय हळूच उठला. त्याच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. जुन्या, फाटलेल्या बुटांमुळे तो किती दिवस लाजिरवाणा होत होता, हे फक्त त्यालाच ठाऊक होतं. वडिलांचं छत्र हरपलेलं, आई असहाय असायची … अशा परिस्थितीत नवीन बुटांचं हे बक्षीस त्याच्यासाठी सोन्यासारखं अमूल्य होतं. त्या क्षणी वर्गात जणू सगळ्या मुलांच्याही डोळ्यात चमक दिसली. पण शिक्षिकेला घरी गेल्यावर पतीसमोर ही गोष्ट सांगताना अश्रू थांबले नाहीत.
पतीने विचारलं, “अगं, आनंदाची गोष्ट आहे, मग रडतेस का?”
शिक्षिका हुंदके देत म्हणाल्या, “मला अजयचे बूट पाहून नाही, तर बाकी मुलांच्या हृदयातलं ममत्व पाहून रडावंसं वाटतंय. कारण जेव्हा मी डब्यातील उरलेले कागद उघडले… त्यावर सगळीकडे फक्त एकच नाव होतं – अजय.” त्या लहानग्या मुलांनी अजयच्या चेहऱ्यावरचं दुःख, त्याची असहायता ओळखली आणि त्याच्या वाट्याला आनंद यावा म्हणून स्वतःचं नाव न लिहिता त्याचं नाव लिहिलं. ती निरागस मुलं त्याच्या वेदना जाणून घेऊ शकली, पण मी त्याच्या डोळ्यांतील ती व्यथा ओळखू शकले नाही… याचं मला आयुष्यभर दुःख राहील! 

     मित्रांनो शिक्षणाची ताकद फक्त पुस्तकात किंवा वर्गात नसते, ती मुलांच्या निर्मळ मनात आणि करुणेत दडलेली असते.
त्या निरागस मुलांनी जे शिकवलं ते कदाचित कुठल्याही पाठ्यपुस्तकात सापडणार नाही.
 तात्पर्य:-खरा आनंद आपल्याला मिळालेल्या गोष्टींमध्ये नसतो, तर इतरांच्या चेहऱ्यावर आणलेल्या हास्यात असतो.