⚜️विश्वास⚜️

⚜️विश्वास⚜️

    एकदा एक माणूस वाळवंटात हरवला होता. त्याच्याकडे थोडंसं अन्न आणि पाणी होतं, पण ते लवकरच संपलं. गेले दोन दिवस तो पाण्याच्या एक थेंबासाठीही तळमळत होता. त्याला आतून जाणवू लागलं होतं की जर काही तासांत पाणी मिळालं नाही, तर त्याचा मृत्यू निश्चित आहे. पण तरीही त्याच्यात आशा जिवंत होती आणि तो मनापासून पाण्याच्या शोधात होता. त्याने हार मानली नव्हती. त्याला विश्वास होता की कुठे ना कुठे पाणी मिळेलच. आणि मग त्याला एका झोपडीसारखी काहीतरी गोष्ट दिसली. सुरुवातीला त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.
    पूर्वीही त्याला मृगजळामुळे फसवणूक झाली होती. पण आता त्याच्याकडे विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण हीच त्याची शेवटची आशा होती. तो आपली शिल्लक ताकद एकवटून त्या झोपडीकडे चालू लागला. जसजसा तो जवळ गेला, त्याची आशा वाढू लागली. आणि या वेळेस नशीब त्याच्या बाजूने होतं. ती खरंच एक झोपडी होती.
     पण काय, झोपडी ओस पडलेली होती. असे वाटत होते की खूप वर्षांपासून कोणीही इथे आलेले नव्हते. तरीही पाण्याच्या आशेने तो झोपडीमध्ये गेला. आत गेल्यावर त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. तिथे एक हँडपंप होता, पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तळमळणाऱ्या त्या माणसात नवचैतन्य निर्माण झालं. तो जोरजोरात हँडपंप चालवू लागला.
   पण हँडपंप कोरडाच निघाला. तो निराश झाला. त्याला वाटलं आता आपला अंत जवळ आला आहे. तो थकून खाली कोसळला. तेवढ्यात त्याला झोपडीच्या छताला बांधलेली पाण्याची एक बाटली दिसली. कसंबसं करून तो त्या बाटलीजवळ पोहोचला आणि ती उघडून प्यायला लागला, तेवढ्यात त्याला बाटलीवर चिकटवलेला एक कागद दिसला.
   त्यावर लिहिलं होतं, हे पाणी हँडपंप सुरू करण्यासाठी वापरा आणि नंतर बाटली पुन्हा भरून ठेवायला विसरू नका.
 ही फारच विचित्र परिस्थिती होती. त्या माणसाला कळत नव्हतं की तो पाणी प्यावं की पंपात ओतावं. त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले, जर पाणी ओतूनही पंप चालला नाही तर? जर कागदावरील गोष्ट खोटी ठरली तर? जर जमिनीखालचं पाणीही आटलेलं असेल तर? पण जर पंप चालू झाला तर? जर गोष्ट खरी ठरली तर?
 थोडा विचार करून त्याने शेवटी नक्की केलं. त्याने बाटली उघडली आणि थरथरत्या हातांनी ते पाणी हँडपंपात ओतलं. तो हँडपंप चालवू लागला, एक, दोन, तीन वेळा, आणि अचानक पंपातून थंडगार, निर्मळ पाणी बाहेर यायला लागलं.
   त्याने भरपूर पाणी प्यायलं. त्याला पुन्हा ऊर्जा मिळाली. त्याचं डोकं काम करायला लागलं. त्याने बाटली पुन्हा भरली आणि ती तशीच छताला बांधून ठेवली. तेवढ्यात त्याला आणखी एक काचेची बाटली दिसली. त्यात एक पेन्सिल आणि एक नकाशा होता, ज्यात वाळवंटातून बाहेर जाण्याचा मार्ग दर्शवलेला होता.
   त्याने तो मार्ग लक्षात ठेवला आणि नकाशावाली बाटली पुन्हा तिथे ठेवली. नंतर त्याने आपल्या इतर बाटल्यांमध्ये पाणी भरलं आणि झोपडीतून बाहेर पडला. थोडं पुढे जाऊन त्याने मागे वळून पाहिलं आणि काहीतरी विचार करून परत झोपडीत गेला. त्याने पाण्याच्या बाटलीवरच्या कागदावर लिहिलं.
"माझ्यावर विश्वास ठेवा, हा हँडपंप खरंच चालतो."
तात्पर्य :  आयुष्यात कितीही वाईट परिस्थिती आली तरी आपली आशा सोडू नये. काही मोठं मिळवायचं असेल, तर आपल्यालाही आधी काहीतरी द्यावं लागतं, ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात फार महत्त्वाच्या असतात, त्या गोष्टी कुणासाठी- ते ज्ञान असू शकतं, कुणासाठी प्रेम, तर कुणासाठी पैसा. हे जे काही आहे, ते मिळवण्यासाठी आधी त्याचं बीज आपल्या कृतींच्या पंपात टाकावं लागतं. आणि त्याच्या बदल्यात आपण त्या गोष्टीचं अनेकपट अधिक मूल्य प्राप्त करतो. एक व्यक्तीने केलेलं चांगलं कार्य दुसऱ्यापर्यंत, तिसऱ्यापर्यंत पोहोचत जातं, हेही ही गोष्ट आपल्याला शिकवते.