मेण व मेणबत्ती
मेणाचा वापर पुरातन काळापासून ज्ञात आहे. विविध औषधी मलमे, लाकडाला पाॅलिश करणे, मेणबत्त्या तयार करणे यांसाठी मेण वापरले जाते. मेणाचा शेक देऊन सांधेदुखी बरे करणे हाही अनेक वर्षे वापरला जाणारा उपचार आहे. मेणाची उपलब्धी हा आता फारसा कठीण प्रश्न राहिलेला नाही; कारण खनिज तेलापासून पॅराफीन वॅक्स हा मेणाचा प्रकार भरपूर प्रमाणावर उपलब्ध आहे. पूर्वीच्या काळी मुख्यत: मधमाशांच्या पोळ्यातून मिळवलेले मेणच उपलब्ध असे. तेव्हा त्याची किंमत जास्त व उपलब्धी अगदी कमी प्रमाणात होती.
मधमाशा त्यांच्या पोळ्यात मध भरून झाला की, त्याचे तोंड अंगच्या मेणाने बंद करून टाकतात. माणूस प्रथम मध काढून घेतो व नंतर पोळ्यातील मेण काढले जाते. घट्टसर पण मऊ गोळ्यासारखे हे मेण आजही औषधी उपयोगाला पसंत केले जाते.
चरबीपासुन मेण बनवले जाते, पण त्याला दुर्गंधी येते; त्यामुळे आता हा प्रकार वापरणे खूपच कमी झाले आहे. सध्या वापरात असलेला मेणाचा प्रकार म्हणजे पॅराफीनपासून काढलेले मेण. हे मेण सहसा पन्नास डिग्री सेंटीग्रेड तापमानाला वितळते. वितळल्यावर त्यामध्ये अनेक रंगही मिसळता येतात. साच्यांमध्ये घालून पाहिजे ते आकारही देता येतात.
मेणाचे पुतळे व त्यांची संग्रहालये हा जगाचा आवडीचा विषय आहे. हुबेहूब दिसणारी माणसे निर्माण केलेले, म्हणजे मेणाचे पुतळे असलेले मादाम तुसा यांचे संग्रहालय तर जगप्रसिद्धच आहे. याच विषयावरील 'हाऊस ऑफ वॅक्स' हा सिनेमाही जगप्रसिद्ध झाला होता. मेणाची फुले शोभेसाठी बनवुन मांडण्याची आपल्याकडेही प्रथा आढळते.
मेणाचा उपयोगी लाकूड, लेदर याला पाॅलिश करताना, त्यातील भेगा भरताना सरसकट केला जातो. यामुळे या वस्तूंचे आयुष्य वाढते. चपला, बूट यांना करावयाच्या पाॅलिशमध्येही मेणाचा अंश असतोच.
प्लास्टिक आवरणांचे युग सुरू होण्यापूर्वी तेलकट खाद्यपदार्थ साठवताना अगदी कागदी आवरणावर पातळ मेणाचा थर देण्याची पद्धत वापरली जाई. यामुळे पदार्थ कुरकुरीत राहण्याला मदत होत असे. सध्या ही पद्धत मागे पडली आहे.
याचप्रमाणे एखाद्या डब्यातील, बाटलीतील पदार्थ हवाबंद राखण्यासाठी आजही मेणाने तोंड बंद करण्याची पद्धत सरसकट वापरली जाते. मुंग्यांपासून प्रतिबंध करतानाही मेणाचा थर देणे सोपे राहते. सरसकट प्रत्येक ठिकाणी वापरल्या जाण्याला चैनला मेणाचा हलका थर देण्याची पद्धत आहे. त्यामुळे चैनच्या दोन दात्यांमधील हालचाल सहजपणे होते. चैनचे आयुष्य वाढते.
सांधेदुखीसाठी फिजिओथेरेपी व उपचार म्हणून वॅक्स बाथ आज जगभर वापरला जातो. वितळलेल्या मेणाचा लेप देऊन किंवा चक्क त्यामध्येच अवयव बुडवून मिळणारी उष्णता अनेक आजारांतुन बरे व्हायला व हालचाली सुलभ व्हायला मदत करते. मात्र हे उपचार देखरेखीखाली करणे आवश्यक असते.
मानवी शरीरातही कातडीतून स्रवणारे स्त्राव, कानाच्या अंतर्भागातील स्राव यांमधून मेणाचा अंश जमत असतो. त्याचे प्रमाण अत्यल्प असले तरी ते मेणच असते. याचा थर आपल्या शरीराला बाह्य धूळ व हवा यांपासून संरक्षण देतो. उंचावर जाणारे गिर्यारोहक व ध्रुवीय प्रदेशात जाणारे प्रवासी यांना आंघोळ न करण्याची सूचना नेहमीच दिली जाते. हा थर निघून जाऊन मिळणारे संरक्षण नष्ट होऊ नये यासाठीची ही सूचना असते.
मेणबत्त्या विविध आकारांच्या असतात. पुरुषभर उंचीची व सहा इंच परिघाची मेणबत्तीही पाहायला मिळते. मेणबत्तीच्या मिळण्यातील वितळलेल्या हायड्रोकार्बन्सचा पुरवठा वातीला होत असतो. त्यामुळे वात संथ जळते. पिवळसर ज्योत मंद प्रकाश देते. मेणबत्तीच्या शांत उजेडामध्ये एखाद्या रात्री कधी जेवला आहात काय ? तो एक वेगळाच अनुभव असतो. चर्चमधील मेणबत्त्यांचा प्रकाश झुंबरांमध्ये लावलेल्या मेणबत्त्यांचा सर्वत्र पसरलेला उजेड हा कधीपासून वापरात आला आहे कुणास ठाऊक. पण इजिप्तमधील ममीजबरोबर सुद्धा मेणबत्त्या सापडतात.
** संकलन **
श्री. औटी बबन मोहन
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडवी
श्री. औटी बबन मोहन
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडवी
ता. कर्जत, जि. अहमदनगर