⚜️नक्कल ⚜️
एक शेतकरी
होता. त्याने एक मांजर आणि एक गाढव पाळलं होतं. ते मांजर त्या शेतकर्याचं अतिशय
लाडकं होतं. शेतकरी घरी असला की ते सतत त्याच्या मागे पुढे घोटाळायचं. कधी मांडीवर
जाऊन बसायचं तर कधी वेगवेगळे अंगप्रत्यंग करून शेतकर्याकडून कौतुक करून घेत असे.
शेतकरी जेवायला बसला की त्याच्या बाजूला बसून म्याऊ म्याऊ करत त्याच्या ताटातला
घास मागत असे. मांजराचे हे लाड गाढव बघत असे. त्याला त्या मांजराचा हेवा वाटायचा.
‘‘मी दिवसभर राबराब राबतो पण कौतुक मात्र मांजराचं ?’’ या विचारांनी त्याला राग
यायचा. शेवटी गाढवाने ठरवलं. मांजरासारखं वागायचं म्हणजे आपलंपण कौतुक होईल !
दुसर्या दिवशी शेतकरी अंगणात येताच गाढव त्याच्या
पायात घोटाळू लागलं. त्याचं अंग चाटायला लागलं. त्याच्या पुढे उभं राहून दोन
पायांवर नाचायला लागलं. मांजराच्या म्याऊ, म्याऊ सारखा आपला सूर लावून
विचित्र आवाजात रेकायला लागलं. शेतकर्याला त्याचं वागणं विचित्र वाटलं पण त्याने
दुर्लक्ष केलं. दुपारी शेतकरी जेवायला बसला हे पाहून गाढव सरळ झोपडीत शिरलं आणि
ताटातल्या घासाच्या अपेक्षेने त्याच्या बाजूला जाऊन बसलं. ते पाहून शेतकर्याला राग
आला आणि कोपर्यातील काठी घेऊन त्याने गाढवाला चांगलं बडवून काढलं. त्या वेळेस
गाढवाच्या लक्षात आलं, ‘‘आपण म्हणजे मांजर नाही.’’
तात्पर्य :- कधी कोणाची नक्कल करू नये.