⚜️भिकारी आणि तरूण मुलगा⚜️
एक भिकारी होता. तो आंधळा व पांगळा होता. सतत एका जागी
बसून असायचा. कधी त्याला खायला मिळे तर कधी उपाशीपोटी झोपून जाई. त्यामुळे त्याची
अवस्था हाडाच्या सापळ्यासारखी झाली होती. जन्माने तो अंध नव्हता तर वृद्धत्वामुळे
त्याला अंधपणा आला होता. त्यातच त्याला कुष्ठरोगही झाला होता. त्यामुळे लोक जरासे
त्याच्यापासून लांबच राहत. बिचारा भिकारी रस्त्यावर बसून लोकांकडे कळवळून भीक
मागत असे. पण त्याच्या त्या कुरुप रुपामुळे तो कुणालाही आवडत नसे. त्याच रस्त्यावरून एक कॉलेजवयीन तरूण जात
असे. त्याचा जाण्यायेण्याचा रस्ताच तो होता त्यामुळे त्या तरूणाला हा भिकारी
रोजच दिसत असे. भिका-याची अशी अवस्था पाहून तरूणाला खूप वाईट वाटे. कधीकधी तो
दोनपाच रूपये त्या भिका-याला देतही असे पण मनातून मात्र तो खूप दु:खी होत असे.
तरूणाला वाटे की आंधळा, पांगळा, कुष्ठरोग झालेला
देह घेऊन जगताना या जीवाला किती यातना होत असतील. देवसुद्धा अशा जीवांना पटकन का
बरे उचलत नाही. एकेदिवशी तो भिका-याजवळ थांबला व म्हणाला,''बाबा,
देवाने अशी अवस्था केली असतानासुद्धा तुम्ही देवाचेच नाव घेऊन का
जगत आहात. तुम्ही भीक मागून पोट भरता, पण देवाला मरण मागण्याची
तुम्ही का प्रार्थना करत नाही.'' तरूणाच्या या बोलण्यावर
भिकारी हसला व म्हणाला,''मुला, मरण
मागून या यातनांपासून दूर जावे ही गोष्ट मला किंवा परमेश्वराला दोघांनाही कळते
पण कितीही जरी मी प्रार्थना केली तरी या जन्माचे भोग भोगल्याशिवाय माझी सुटका
नाही हे त्या परमेश्वराला जास्त कळते आणि मी रोजच झोपण्यापूर्वी प्रार्थना
करतो की देवा यातून सुटका कर पण देवाला वाटते की, मला जास्तीत
जास्त लोकांनी बघावे आणि विचार करावा की पूर्वी मी ही तुमच्यासारखाच हातीपायी धड
होतो, सुंदर दिसत होतो पण अपघातात पाय गेले, म्हातारपणाने डोळे गेले आणि अचानक कुष्ठ उदभवले. यातून परमेश्वर सुचवू
पाहतो आहे की सगळे दिवस सारखे नसतात त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अहंकार बाळगू
नये.'' भिका-याचे हे बोल ऐकताच तरूण मुलगा अचंबित झाला,
त्याच्या सहज बोलण्यात त्याने फार मोठे तत्वज्ञान शिकविले
होते.
तात्पर्य:- सर्व दिवस सारखे नसतात, त्यामुळे
प्राप्त परिस्थितीमध्ये अहंकार न बाळगणे हेच बरे.