⚜️मनाची शुध्दता⚜️
दोन तरुण साधु उंच डोंगरावर असणाऱ्या आपल्या मठाकडे
निघाले होते. रस्त्यामध्ये एक ओढा होता. तो ओढा खूप पाण्याने भरलेला असून खोलही
होता. त्या ओढ्याच्या काठी एक तरुण युवती बसलेली होती. त्या तरुणीलाही तो ओढा पार
करून पलीकडील बाजूस असणाऱ्या गावात जायचे होते. पण ओढ्याला असणाऱ्या पाण्यामुळे ती
तो ओढा पार करू शकत नव्हती. पावसाळ्याचे दिवस होते, पाउस पडत होता, ओढा जोराने खळखळत वाहत होता. तरुणीला तर ओढा पार करून पलीकडे जाणे गरजेचे
होते. पाण्याला ओढ जास्त असल्याने ती एकट्याने पाण्यात उतरण्याचे धाडस करत नव्हती.
दोन साधुंपैकी एका साधूने हे दृश्य पाहिले व त्याने त्या तरुणीला विश्वासपूर्वक
दोन गोष्टी सांगितल्या व त्या तरुणीला आपल्या खांद्यावर बसवले आणि त्या तिघांनी
मिळून तो ओढा पार केला. तरुणीने तो ओढा पार होताच साधूचे आभार मानले व ती आपल्या
गावात निघून गेली. दोन्ही साधू आपल्या आश्रमाकडे निघाले. ज्या साधूने तरुणीला
खांद्यावर घेतले होते त्याच्याशी दुसरा साधू बराच वेळ काहीच बोलला नाही. खूप वेळ
घुश्यात चालल्यावर त्या साधूने दुसऱ्या साधूच्या मनातील चलबिचल ओळखली व तो त्याला
म्हणाला,"मित्र! बरेच वेळ मी पाहतो आहे पण तुला काही
तरी खुपते आहे.तेंव्हा विना संकोच तू मनातील गोष्ट मला सांग." तो दुसरा साधू
म्हणाला,"हे मित्रा, आपल्या
संप्रदायामध्ये स्त्री स्पर्श सुद्धा वर्ज्य आहे. तरी तू त्या स्त्रीला खांद्यावर
बसवून ओढा पार केलास हे काही मला आवडले नाही. स्त्रीकडे बघणे, स्पर्श करणे हे महत्पाप तू केले आहेस. तेंव्हा तू माझ्या मनातून उतरला
आहेस." त्यावर तो मदत करणारा साधू म्हणाला,"असं
आहे तुझ्या नाराजीचे कारण! पण मित्रा, ती स्त्री जेंव्हा
माझ्या खांद्यावरून उतरली तेंव्हाच मी तिला सोडले, मात्र तू
अजूनही तिला मनात बाळगून आहेस. मी तिला मदत करण्याच्या दृष्टीने स्पर्श केला पण तू
अजूनही मनातून तिला वारंवार स्पर्श करत आहेस. संन्यास याचा अर्थ कुणाचीही सेवा न
करता अलिप्त राहणे असा न होता मनातील वासना आणि विकारांवर ताबा मिळवणे असा होतो.
ज्यावेळी त्या स्त्रीला मी उचलून खांद्यावर घेतले तेंव्हाही माझ्या मनात फक्त
सेवेची भावना होती मग ती स्त्री आहे का पुरुष याचा मी विचार केला नाही. मनातून
सुद्धा विकार जर संपविता आले तरच साधुपण आले असे समजता येईल आणि मग त्यासाठी
संन्यास घेण्याचीही आवश्यकता नाही. गृहस्थ राहूनही जर विकारांवर नियंत्रण करता आले
तर त्या व्यक्तीला साधुपण मिळेल."
तात्पर्य:- मनातून चांगले आचरण असल्यास बाहेरील आचरण
हे चांगलेच होते. मनात पाप ठेवून चांगले बनता येत नाही.