⚜️मूर्ख डोमकावळा⚜️

 ⚜️मूर्ख डोमकावळा⚜️          

       एका गरूडाने कुरणात चरत असलेल्‍या मेंढ्यांच्‍या कळपातील एका कोकरावर झडप घातली व त्‍या कोकराला पळवून नेले. त्‍याचे हे धाडस आणि सामर्थ्‍य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्‍या गरूडाकडे भीतीयुक्‍त आदराने पाहू लागले. 'गरूडाने पळवले त्‍यापेक्षाही मोठे कोकरू जर आपण पळवले तर गरूडापेक्षाही आपला मानसन्‍मान वाढेल, त्‍याच्‍याइतकीच प्रतिष्‍ठा आपल्‍याला लाभेल असे एका डोमकावळ्याला वाटले.  त्‍यासाठी त्‍याने नजर ठेवून एका मोठ्या थोराड अशा कोकराच्‍या पाठीवर बसून त्‍याला उचलण्‍याचा प्रयत्‍न केला पण ते कोकरू उचलले जाण्‍याऐवजी, डोमकावळ्याचेच पाय कोकराच्‍या पाठीवरील लोकरीमध्‍ये अडकले व तिथून सुटण्‍यासाठी त्‍याने पंखांची केलेली फडफड व आरडाओरड मेंढपाळाच्‍या कानी गेली.
      तो तिथे आला व त्‍याने डोमकावळ्याला सोडविले व पिंज-यात कैद केले व त्‍याला स्‍वत:च्‍या मुलांच्‍या स्‍वाधीन केले. मुलांनी मेंढपाळाला विचारले,''बाबा या पक्ष्‍याचे नाव काय हो'' यावर तो मेंढपाळ हसून म्‍हणाला,'' या मूर्ख पक्ष्‍याला जर तुम्‍ही याचे नाव विचारले तर हा स्‍वत:ला गरूडापेक्षाही श्रेष्‍ठ असा पक्षी म्‍हणून स्‍वत:ची ओळख करून देईल पण प्रत्‍यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक मूर्ख डोमकावळा आहे.''
तात्पर्य:- काही लोकांना मोठेपणाचा आव आणण्‍याची प्रचंड सवय असते. यामध्‍ये त्‍यांनी कितीही जरी मोठेपणाचे सोंग घेतले तरी इतर सूज्ञ लोक हे त्‍यांची पात्रता जाणून असतात.