⚜️खरा मिञ⚜️

 ⚜️खरा मिञ⚜️

    आश्रमात राहणाऱ्या शिष्यांनी एके दिवशी आपल्या गुरूला एक प्रश्न विचारला,"गुरुजी ! धन, कुटुंब आणि धर्म यापैकी खरा सहकारी कोण आहे? " गुरुजींनी एक कथा ऐकवली. ती पुढीलप्रमाणे - एका व्यक्तीला तीन मित्र होते, तिघांपैकी पहिला त्याला प्रिय होता. तो प्रत्येक दिवशी त्याला भेटायचा. प्रत्येक कामात त्याची सोबत करायचा. दुसऱ्या मित्राबरोबर त्याची मध्यम स्वरूपाची मैत्री होती. दुसरा मित्र २-३ दिवसातून भेटायचा आणि क्वचितच त्याच्या सोबत असायचा. तिसरा मित्राला मात्र तो २ महिन्यात एकदा भेटायचा आणि कोणत्याही कामात त्याची मदत घेत नसे. एकदा त्या व्यक्तीकडून काहीतरी चूक झाली. त्यामुळे त्याला राजदरबारात बोलावण्यात आले. तो घाबरला. त्याने पहिल्या मित्राला सांगितले व नेहमीप्रमाणे सोबत राहण्याचा आग्रह केला. मात्र त्याने सर्व गोष्ट ऐकून सोबत राहण्यास नकार दिला. कारण तो राजाशी आपले संबंध बिघडवू इच्छित नव्हता. दुसऱ्या मित्रानेही त्याला सोबत येण्याची तयारी दर्शविली पण अचानक कामाचे कारण सांगून येण्याची टाळाटाळ केली. त्या व्यक्तीने तिसऱ्या मित्राला विचारताक्षणी तो त्याच्यासोबत गेला आणि राजासमोर त्या व्यक्तीची बाजू मोठ्या धीराने व खंबीरपणे मांडली. राजाला पण ते कथन योग्य वाटल्याने त्याने त्या व्यक्तीला दोषमुक्त केले. ही कथा ऐकवून गुरुजींनी समजावले पहिला मित्र म्हणजे पैसा. ते परमप्रिय असते पण मृत्युनंतर काहीच कामी येत नाही. तर दुसरा मित्र म्हणजे कुटुंब. आपले आपले म्हणणारे शेवटी आपल्याला वेळेला उपयोगी पडत नाहीत. आणि तिसरा मित्र म्हणजे आपला धर्म, जो आपल्याला जिवंत असेपर्यंत साथ देतोच पण मृत्युनंतर ही तो एकमेव आपल्या सोबत असतो.

तात्पर्य:- माणसाने आपल्या वर्तनातून आपल्या मनूष्य धर्माचे पालन केले पाहिजे, जे माणूसकीच्या दृष्टिने योग्य आहे.