⚜️बिनधास्त⚜️
ज्याला कशाचीही भीती किंवा काळजी नसते त्याला बिनधास्त असे म्हटले जाते. आपण माणसे प्रत्येक कृती करताना चांगल्या - वाईट परिणामांचा विचार करत असतो. बहुतेक पक्षी आणि प्राणीही असेच वागताना दिसतात. गाडी येत असल्याचे दिसताच रस्त्यावर असलेला कुत्रा बाजूला पळत सुटतो. कुत्रा येताना दिसताच माकड दूर सुरक्षित ठिकाणी जाते. पतंगाकडे पाहून मला मात्र गंमत वाटते. वाऱ्याबरोबर सरसरत उंच जाणारा पतंग कसा बिनधास्त असतो. उंच आकाशात एकट्याने जाण्याची, वेगाने खाली येण्याची, एखादया इमारतीवर किंवा झाडावर अडकून बसण्याची कशाचीच त्याला धास्ती नसते. दोरा तुटला तरी मजेत वारा नेईल तिकडे प्रस्थान ठेवतो. कुठेही बिनधास्त अंग टाकतो. आकाशात उडणारे पक्षीसुद्धा पतंगाला वळसा घालून निघून जातात. पतंग मात्र बिनधास्तच असतो.