⚜️कुत्रा आणि भाकरी⚜️

 ⚜️कुत्रा आणि भाकरी⚜️

  एक होता कुत्रा. त्याचे नाव होते शेरू. त्याला खूप भूक लागली होती. तो भाकरीच्या शोधात भटकत होता. खूप फिरल्यावर त्याला एक भाकरीचा तुकडा मिळाला. शेरू खूप खूश झाला. दुपार झाली होती. ऊन तापले होते. ही भाकरी शांतपणाने खावी म्हणून तो सावलीकडे निघाला. तोंडात भाकरीचा तुकडा होता.
   शेरूला नदी पार करून जायचे होते. नदीवर एक छोटा पूल होता. शेरू पुलावर आला. जाता जाता त्याने पाण्यात पाहिले. पाण्यात एक कुत्रा दिसला. त्याच्याही तोंडात भाकरीचा तुकडा होता. तो तुकडा पाहून शेरूच्या तोंडाला पाणी सुटले. पाण्यातला कुत्रा मरतुकडा होता. या कुत्र्याकडून भाकरीचा तुकडा मिळविता येईल, असे शेरूला वाटले. तो तुकडा आपल्याला मिळाला तर बहारच येईल. त्यासाठी थोडे प्रयत्न करायला हवेत. थोडे भुंकले की दुसरा कुत्रा भाकरी टाकून देईल. ती भाकरी आपल्याला मिळेल. दोन्ही तुकडे मग आपल्याला खाता येतील. आपले चांगले पोट भरेल.
  पुलावर उभ्या असलेल्या शेरूने विचार केला. वेळ घालविणे योग्य नाही म्हणाला. तो पाण्यातल्या कुत्र्यावर जोराने भुंकला.
  भुंकण्यासाठी शेरूने तोंड उघडताच त्याच्या तोंडातील भाकरीचा तुकडा पाण्यात पडला. शेरूने खाली वाकून पाहिले. भाकरीचा तुकडा वाहून गेला. त्याने पाण्यातील कुत्र्याकडे पाहिले. त्याच्याही तोंडात भाकरीचा तुकडा नव्हता.
  शेरू निराश झाला. दुसरा तुकडा मिळविण्याच्या नादात तो पहिलाही तुकडा गमावून बसला.
त्याला खूप भूक लागली होती; पण आता काही पर्याय नव्हता.”
       “शेरू पुलावरून खाली उतरला. नदीत गेला. गार पाणी पिऊन थोडा शांत झाला. सावलीत बसण्याऐवजी भाकरीच्या शोधात पुन्हा भटकायला निघाला.

 तात्पर्य:- लोभ करू नये. अतिलोभामुळे आहे तेही गमवावे लागते.”