⚜️निरोगी मन⚜️

 ⚜️निरोगी मन⚜️

   शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांची ही कथा. एके दिवशी गुरुनानक एका लहानशा गावात पोहोचले. रात्रीची वेळ होती. नानक खूप थकले होते. त्यांना भूक लागली म्हणून ते जेवण्याची व राहण्याची व्यवस्था होईल अशी जागा शोधू लागले. रस्त्यात त्यांना काही माणसे दिसली. गुरूंनी त्यांच्याजवळ जागेची चौकशी केली. ती माणसे दृष्ट व टवाळखोर होती. नानकांची फजिती करण्यासाठी बोटानेच एक घर दाखवले. गुरुनानक त्या घराजवळ गेले. दारावर थाप मारली. एका माणसाने दार उघडले. त्या माणसाच्या हातात असलेल्या दिवटीच्या प्रकाशात नानकांनी त्याच्याकडे पाहिले. त्याच्या सर्वांगावर जखमा होत्या. गुरुनानकांनी त्याला म्हटले, 'मी अतिशय थकलों आहे. मला खूप भूकही लागली आहे. आज रात्रीपुरती झोपायला जागा देऊ शकशील का ?' यावर तो माणूस म्हणाला, "मी तुझे आनंदाने स्वागत करीन, पण मी एक कुष्ठरोगी आहे. कुणीही माझ्याजवळ फिरकतदेखील नाही. तू माझ्याबरोबर जेवशील का ? तुला आवडेल का ?" यावर गुरुनानक म्हणाले, “तुझे शरीर जीर्ण झाले असेल पण तुझे मन स्वच्छ आहे, मी तुझ्याजवळच राहणार" गुरुनानकांनी बरेच दिवस त्या कुष्ठरोग्याच्या सान्निध्यात घालविले व स्वतः त्याची सेवा करून त्याला रोगमुक्त केले. संपूर्ण गावातून ते त्या माणसाबरोबर फेरफटका मारत होते, हे दृश्य पाहून लोकांना खूप आश्चर्य वाटले.

तात्पर्य:- मनुष्याचे मन निरोगी, स्वच्छ असेल तर त्याची कृती विचार व आचरणही सात्त्विक असते.