⚜️धूळ नाही, केर नाही घर कसं लख्ख⚜️
मशेरी गं मशेरी वाजले सात
चल चल उठ, घास माझे दात
अगं अगं झाडूबाई, कोपर्यात दडूबाई
चल चल उठ, कामाला लाग
मला आहे मोठा कचर्याचा राग
केराच्या टोपलीत केर नको ठेऊ
कचर्याच्या पेटीत ओत जा पाहू
फडकेराव फडकेराव झटकन या
टेबल नि खुर्च्या झटकून घ्या
चपला नि बूट, तुम्ही ओळीत रहा
घरातील गंमत, बाहेरून पहा
कात्रीबाई कात्रीबाई हलकेच या
वाढलेली नखे कातरून घ्या
साबू नि टॉवेल तुम्ही आंघोळीला चला
अंग माझं मळलंय, न्हाऊ दे मला
साबूराव साबूराव काढा तुमचा फेस
आधी मला धुवू दे माझे केस
आता हळू हळू अंग माझे चोळा
अंग माझे चोळा नि घालवा मळा
टॉवेलराव टॉवेलराव अंग माझे पुसा
हळू हळू नको, पुसा घसा घसा
कसं काय आरसेराव बरं आहे ना?
सारं काही ठीकठाक झालंय ना?
सारं काही ठीकठाक, पोशाख कसा झक्क
धूळ नाही, केर नाही घर कसं लख्ख
आता इथे रोगराई शिरायची नाही
नि आजारी पडायची भीतीही नाही
तुमचं घरही असंच ठेवा
बरं आता येतो राम राम घ्यावा