⚜️आज गोकुळात⚜️

 ⚜️आज गोकुळात⚜️

आज गोकुळात रंग खेळतो हरी,
राधिके जरा, जपूनी जा तुझ्या मरी ॥धृ॥

तो चकोर चित्त चोर वाट रोखतो
हात ओढूनी खुशाल रंग टाकतो
रंगवूनी, रंगूनी, गुलाल फासतो
सांगते, अजून तुला मी परोपरी ॥१॥

सांग श्यामसुंदरास काय जाहले, 
रंग टाकण्याविना कुणा ना सोडले
ज्यास त्यास रंगवुनी रंग लावले
एकटीच वाचशील काय तू घरी ||२||

त्या तिथे अनंत रंग रास रंगला, 
गोप गोपिके सवे मुकुंद दंगला
तो पहा मृदुंग मंदीरात वाजला
हाय वाजवी फिरुनी तिच बासरी ||३||