⚜️ससा आणि चिमणा⚜️

 ⚜️ससा आणि चिमणा⚜️

   एका जंगलातील झाडावर एक चिमणा रहात होता. त्याला आपल्या सोबत्यांकडून कळले की बाजूच्या प्रदेशात उत्तम पीक आले आहे. त्यामुळे भरपूर खाणे मिळण्याच्या आशेने तो चिमणा इतर सोबत्यांबरोबर बाजूच्या प्रदेशात गेला. तिकडचे भरपूर खाणे बघित्लयावर घरी परतण्याची त्याला आठवणही येत नाही. चिमणा बरेच दिसव या प्रदेशात रहातो.
        इकडे चिमण्याच्या रिकाम्या घरट्यात एक ससा येऊन राहतो. काहीदिवसांनी धष्टपुष्ट झालेला चिमणा आपल्या घराच्या ओढीने परत येतो. तेव्हा आपल्या घरट्यात सशाला बघून तो म्हणतो, “चालता हो इथून! दुसऱ्याच्या घरात शिरताना तुला लाज वाटली नाही?"
    "उगीच मला कशाला शिव्या घालतोस? हे घर माझे आहे!" ससा शांतपणे उत्तरतो.“माझ्या घरात घुसून मलाच हुसकवतोस काय?" चिमणा रागाने बोलतो.त्याबरोबर ससा त्याला समजावतो, "हे बघ ... विहीर, तळे, झाड हे एकदा सोडून गेल्यावर त्यावर थोडीच आपली मालकी सांगता येते?" तेव्हा चिमणा म्हणतो, “आपण एखाद्या धर्मपंडिताकडे जाऊन त्यास या वादावर निकाल देण्यास सांगू !" ससा या गोष्टीस तयार होतो.
त्या झाडापासूनच काही अंतरावर या दोघांचे भांडण ऐकत होते. रानमांजरासमोर येताच रानमांजराने प्रवचन सुरू केले, "संसारात अर्थ नाही. घरदार, बायकामुले हे सर्व काही क्षणभंगुर आहे. धर्मच माणसाचा आदार आहे.”
       ससा त्या रानमांजराचे प्रवचन ऐकून चिमण्यास सांगतो की, "हा कोणी धर्मपंडित दिसतोय. त्यालाच न्यायनिवाडा करण्यास सांगूया !" “पण हा तर आपला जन्मजात वैरी आहे... म्हणून आपण लांबूनच न्याय करायला सांगू !" चिमणा सशाला सांगतो.
      मग दोघेजण त्याला लांबूनच सांगतात, "पंडितजी! आमच्या दोघांत रहाण्याच्या जागेवरून वाद निर्माण झाला आहे. आपल्या शास्त्रानुसार आम्हाला न्याय द्या. आमच्यापैकी जो खोटा ठरेल त्याला आपण खावे." पंडित रानमांजर या बोलण्यावर ताबडतोब उत्तरते, "छे! छे! हिंसेसारखे दुसरे पाप नाही! मी तुम्हाला न्याय देईन. पण खोटा ठरेल त्यास मी खाऊ शकत नाही... हे पाप माझ्या हातून होणार नाही. मला हल्ली म्हातारपणामुळे नीट ऐकायला येत नाही. तुम्हाला जे काही सांगायचे असेल ते जवळ येऊन सांगा बघू!” रानमांजराच्या या धूर्त बोलण्यावर चमणा व ससा विश्वास ठेवतात आणि अगदी जवळ जाऊन बसतात. त्याबरोबर चिमण्याला पंजा मारून व सशाला दातांनी पकडून ते रानमांजर चट्टामट्टा करते.

तात्पर्य: शहाण्या माणसाने विश्वासघात आणि धूर्त माणसांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये.