⚜️जबाबदारी⚜️

 ⚜️जबाबदारी⚜️

   पंडित जवाहरलाल नेहरू एक दिवस खेडेगावात स्वातंत्र्यचळवळीनिमित्त गेले. तेथे त्यांनी भाषण केले. भाषण संपल्यावर एक खेडूत पंडितजीजवळ आला व म्हणाला, “पंडितजी, मी असे ऐकतो की, आपण लवकरच मलायाला जाणार आहात. तेव्हा तिकडून परत  येताना माझे एक लहानसे काम कराल का ?" "अवश्य!' पंडितजी हसून म्हणाले. 'मला ते काम करता येण्यासारखं असेल तर मी ते नक्कीच करीन. सांग पाहू तुझं काम.'
त्यावर तो म्हणाला, 'मी पूर्वी मलायात राहात होतो. तेव्हा माझ्या मुलाला तेथील एक औषधाने गुण आला होता. माझा मुलगा पुन्हा त्याच रोगाने आजारी आहे. परंतु मलायातील ते औषध इथे मिळत नाही. तेव्हा कृपा करून तेवढे ते औषध घेऊन या. पंडितजींनी त्या माणसाचे नाव व पत्ता तसेच औषधाचे नाव लिहून घेतले आणि मलायात गेल्यावर कामाची गर्दी असतानाही त्यांनी ते औषध मिळवून त्या गृहस्थाच्या पत्त्यावर पोस्टाने बिनचूकपणे पाठवून दिले.

तात्पर्य:- आपल्यावर जर कामाची जबाबदारी सोपवली तर ती प्रामाणिक काळजीपूर्वक जबाबदारी स्वीकारून पूर्तता करणे आवश्यक आहे.