⚜️जैसे ज्याचे कर्म तैसे⚜️

 ⚜️जैसे ज्याचे कर्म तैसे⚜️

जगी जीवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर 
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर।।धृ।।

क्षणिक सुखासाठी अपुल्या कुणी होतो नीतिभ्रष्ट 
कुणी त्यागी जीवन अपुले दुःख जगी करण्या नष्ट 
देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर 
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर।।१।।

ज्ञानी असो की अज्ञान, गती एक आहे जाण 
मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान 
सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर 
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर।।२।।

मना खंत वाटुनी ज्याचे शुद्ध होई अंतःकरण 
क्षमा करी परमेश्वर त्या जातो तयाला जो शरण 
अंत पृथ्वीचा बघ आला युगे चालली झरझर 
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर।।३।।