⚜️पक्षांची शाळा⚜️
एकदा पक्षांची भरली शाळा
मास्तर झाला कावळा काळा
मोर झाला हेडमास्तर
पिसारा फुलवून बसला खुर्चीवर
पोपटाने घेतला गणिताचा तास
सोडवायला दिले गणित खास
एक पेरु चार आण्याला
चार पेरु किती आण्याला?
चिऊताई आल्या ठुमकत ठुमकत
विचारु नका त्यांची करामत
कोकिळेने दिली एक तान
बगळ्याने केली उंचच मान
इतक्यात कोणीतरी क्वॅक क्वॅक केले
शाळेत उशीरा बदक आले
कबुतराने केले गुटुर्र.. गु
शाळा सुटली पळा रे धुम