⚜️दृष्‍टीकोन बदला⚜️

⚜️दृष्‍टीकोन बदला⚜️

      एक झाड सुंदर फळाफुलांनी बहरून गेले होते. सुंदरता आणि संपन्‍नतेमुळे पक्षी अधिक प्रमाणात त्‍या झाडावर राहत होते. झाडही आनंदाने आश्रय आणि भोजन देत होते. तसेच वाटसरूंना सावली देण्‍याचे कार्यही झाड प्रामाणिकपणे करत होते त्‍यामुळे वाटसरूंचे आशीर्वाद झाडाला मिळत असत. त्‍यामुळे झाडाजवळ सदैव प्रसन्‍नता असायची मात्र कालांतराने झाडाला या गोष्‍टीचा गर्व झाला आणि माझ्यासारखे दुसरे झाडच नाही, सगळ्या झाडात मीच श्रेष्‍ठ आहे असा भ्रम त्‍याला झाला. काही काळाने झाडाला फळे फुले येण्‍याचे बंद झाले, पानांची गळती सुरु झाली. सावली नसल्‍याने वाटसरू येईनात, फळे नसल्‍याने पक्षी राहिनात अशी अवस्‍था झाली. झाडाला वाईट वाटले त्‍याने तेथून जाणा-या एका सिद्धपुरुषाला विचारले की माझ्या आयुष्‍यभर मी सर्वांची सेवा केली पण माझ्या या वृद्धापकाळी माझी कोणी साधी विचारपूस सुद्धा का करीत नाहीत. काही लोक तर मला तोडण्‍याची भाषा करत आहेत. सिद्धपुरुष म्‍हणाले, अरे वृक्षराजा, तू विचार करण्‍याची पद्धत बदल, जीवनभर लोकांच्‍या कल्‍याणसाठी राबणारा हा तुझा डोलारा आता तुझ्या मृत्‍युनंतरही उपयोगी पडणार आहे. तुझ्या लाकडाचे अनेक उपयोग माणसाच्‍या कल्‍याणासाठी होणार आहेत. मरूनही तू चिरंतन माणसाच्‍या स्‍मरणात राहणार आहेस. तेव्‍हा तू तुझ्या मरणाकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोन बदल. हे ऐकून वृक्षाला आनंद वाटला व त्‍याने दु:ख न मानण्‍याचे ठरवले.

तात्पर्य:- कोणत्‍याही गोष्‍टीकडे सकारात्‍मक दृष्‍टीने पाहिल्‍यास त्‍यातील चांगल्‍या बाबी लक्षात येतात. मात्र नकारात्‍मक विचारसरणीने नुकसान होण्‍याचीही शक्‍यता असते.