⚜️शरीर नावाच्या घराकडे दुर्लक्ष करू नका⚜️
एक शेठजी होते. ते दिवसरात्र आपला व्यवसाय आणि पैसा वाढवण्याचाच विचार करत असत. त्यांना शहरातील सर्वांत श्रीमंत माणूस बनायचे होते. हळूहळू त्यांनी तेही साध्य केले. श्रीमंत होऊन त्यांनी शहरातील सर्वांत मोठे घर बांधले. गृहप्रवेशाच्या दिवशी त्यांनी भव्य पार्टी केली. सर्व पाहुणे निघून गेल्यावर तेही झोपायला त्यांच्या खोलीत गेले. थकव्याने कंटाळलेले असतानाच त्यांना एक आवाज ऐकू आला. मी तुझा आत्मा आहे आणि आता मी तुझे शरीर सोडून देत आहे..! शेठजी घाबरले आणि म्हणाले, अरे, तू असे नको करु. मी तू तुझ्याशिवाय मरेन. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर मला हे यश मिळाले आहे. आता या यशाचा आनंदाने उपभोग घेण्याची संधी चालून आली आहे. शंभर वर्षे टिकेल असे मजबूत घर मी बांधले आहे. कोट्यवधी रुपयांचे हे घर, सुखसोयींनी भरलेले आहे. आता या क्षणी सोडून जाऊ नकोस.
आत्मा म्हणाला, हे माझे घर नाही. माझे घर म्हणजे तुझे शरीर होते. आरोग्य हे त्याचे सामर्थ्य होते. पण पैसे कमावण्याच्या नादात तू त्या घराच्या देखभालीकडे दुर्लक्ष केलेस. आता रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड, लठ्ठपणा, पाठदुखी अशा आजारांनी तुझ्या शरीर नावाच्या घराला घेरले आहे. तुला नीट चालता येत नाही. रात्री झोप येत नाही. तुझे हृदयही कमजोर झाले आहे. आता तूच सांग, अशा जीर्ण घरात राहायला तुला आवडेल का, ज्याच्या आजूबाजूला कमकुवत आणि असुरक्षित भिंती आहेत ?
शेठजी त्या शब्दांवर विचार करु लागले. आत्मा म्हणाला, ज्याची चौकट ढासळत आहे, वाळवी लागलेली आहे, प्लास्टर आणि पेंट उडून गेले आहे, साफसफाई नीट होत नाही, इकडे तिकडे घाण साचून राहते, छत गळत आहे, खिडक्या दारे तुटली आहेत... अशा घरात राहायला तुला आवडेल का..? म्हणूनच मी तुझे हे शरीर नावाचे घर सोडून जाणार आहे. आत्म्याने विचारलेल्या या प्रश्नावर शेठजींकडे समाधानकारक उत्तर नव्हते. शेठजी भीती आणि पश्चातापाने थरथर कापत होते. पण, आत्म्याला थांबवायची ताकद आणि हिंमतही शेठर्जीमध्ये उरली नव्हती. एक दीर्घ श्वास सोडत आत्मा शेठजींच्या शरीरातून निघून गेला. शेठजींचा मृतदेह बंगल्यात पडला होता.
तात्पर्य :- ही कथा आज बहुतांश लोकांची वास्तविकता आहे. आपण यश जरूर मिळवा, पण तब्येतीकडे दुर्लक्ष करुन नाही. नाहीतर, त्या शेठर्जीप्रमाणेच आपण इच्छित स्थळी किंवा ठरवलेल्या उंचीवर पोहोचूनदेखील आपण त्याचा आनंद घेण्यापासून वंचित राहू. हे टाळायचे असेल तर आजपासून सुरुवात करा. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आपले शरीर नावाचे घर मजबूत ठेवा.