⚜️नक्कल पडली महागात⚜️
एका पवित्र जागी एका व्यापाऱ्याने मंदिर बांधायचे ठरविले. मंदिराच्या बांधकामाला त्याने लगेच सुरवात केली. तेथे लाकडाचे सुद्धा काम सुरु झाले. त्यामुळे काही सुतार रोज तेथे कामाला येत असत. मोठाले झाडाचे ओंडके कापून त्यांचे काम चालत असे. समोरच असलेल्या झाडावर एक माकडाची टोळी राहत असे. त्यातील काही माकडे फार उद्योगी होती. ती रोज सुताराना काम करताना पाहात असत.
एक दिवस दुपारच्या वेळेस ते सर्व सुतार जेवायला आणि थोडी विश्रांती घ्यायला जवळच्या नदी काठावर गेले. सुतार तिथे झोपले आहेत असे पाहून सर्व माकडे झाडावरून खाली उतरली. त्यातील काही माकडे जिथे काम करत होती तेथे गेली; आणि सुतारांची हत्यार उस्तरू लागली. एक भले मोठे झाडाचे खोड तिथे पडले होते. सुतारांनी ते अर्धे कापून ठेवले होते. जेवण झाल्यावर ते पूर्ण कापायचे म्हणून त्या अर्ध्या कापलेल्या भागात त्यांनी पाचर म्हणजे लाकडाचा मोठा तुकडा घालून ठेवला होता.
एका माकडाने ते पाहिले. ते त्या खोडावर जाऊन बसले; आणि सुताराप्रमाणे ते पाचर काढू लागले. एका वृद्ध माकडाने तसे करू नको म्हणून सुचविले. परंतु त्या माकडाने पाचर ओढून काढली. त्याबरोबर लाकडाची ती फट बंद झाली. त्यात त्या माकडाची शेपटी अडकली. शेपटीला दुखापत झाल्यामुळे ते ओरडू लागले.
तात्पर्य:- दुसऱ्याची नक्कल केल्याने स्वतःलाच त्रास होऊ शकतो.