⚜️आनंद देण्यातील आनंद....⚜️

 ⚜️आनंद देण्यातील आनंद....⚜️

     आपण आनंद मिळवण्यासाठी काय काय म्हणून करत नाही? काही लोक तर सतत आत्मकेंद्रीत असतात. त्यांना बाह्य जगाशी काही घेणे-देणे नसते. सतत माझे, माझे आणि माझे.. इतके असून खरंच ते मनापासून आनंदी असतात का, हे पाहणे महत्त्वाचे. आपल्याला काय हवं आहे, ते प्रथम आपण इतरांना द्यायला शिकले पाहिजे.  आपण हे समजून घेतले पाहिजे की, इतरांना देण्याचा मार्ग वेगळा आणि इतरांकडून आपल्याला काही मिळण्याचा मार्ग वेगळा असतो. नियतीची कृपा आपण सहजा सहजी समजूच शकत नाही. इतरांना देण्याची कला आपल्याला निसर्गाशिवाय जास्त चांगला प्रकारे अजून कोणीही शिकवू शकणार नाही. जेवढे आपण देतो त्याच्या कितीतरी पटीने ते आपल्याला कोणत्या ना कोणत्या रुपाने नक्कीच मिळते. हा निसर्गाचा अटळ नियम आहे. आपल्याला कोणाकडून आनंद मिळेलच याची काही शाश्वती नसते, पण आपल्याला कोणाला आनंद देण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, आणि "मला आनंद नको" असे कोणीही म्हणत नाही. इतरांना आनंद होईल असे वागायला आणि त्यामध्ये आनंद मानायला जर आपण शिकलो, तर आपल्या आनंदरुपी सागराला कधीच ओहोटी लागणार नाही. निर्गुण, निराकार आनंद हा आपल्या  मानण्यावर असतो. आनंदाचा खळखळता झरा निरंतर वाहता ठेवणे, हे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून आहे. सतत आनंदी राहण्यासाठी मन आणि शरीर स्वस्थ असले पाहिजे. मन आनंदी असले की, शरीर आपोआपच उत्साही राहते. आपले मन प्रफुल्लित ठेवण्यासाठी काही स्वयं-सूचना आपण  वारंवार मनाला दिल्या पाहिजेत. खाली दिलेली वाक्ये मोठ्या अक्षरात लिहून ठेवावीत किंवा प्रत्यक्ष बोलून मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवावीत, आणि रोज सकाळी उठल्यावर प्रथम त्याचे वाचन किंवा श्रवण करावे. त्यामुळे आपल्या मनाचे प्रोग्रामिंग होते, आणि दिवस आनंदात जातो. तर ती वाक्य अशी आहेत... 
  • मी खूप भाग्यशाली आहे. 
  • माझे मन आणि शरीर एकदम निकोप आहे. 
  • आजचा दिवस मी कालच्या पेक्षा जास्त अर्थपूर्ण करणार. 
  • माझ्या समाधानाच्या पातळीत वाढ करणार.
  • आज मी इतरांसाठी चांगली ठरेल अशी एक तरी गोष्ट करणार. 
  • आज मी एकातरी उदास चेहऱ्यावर आनंद पसरवणार.
  • आज मी कोणालातरी कोणत्यातरी प्रकारे मदत करणार. 
  • आज मी कोणतीही तक्रार करणार नाही, नकारात्मक विचार करणार नाही.
  • आज मी दिवसभर आनंदी राहणार...     
         तुम्हाला नेहमी आनंदी रहायाला आवडते ना? मग वरील गोष्टी तुमच्या आयुष्यात समाविष्ट करा आणि काय जादू होते ती पहा...     
 -अनंत देशपांडे_



⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421