⚜️वास्तुशास्त्र⚜️

⚜️वास्तुशास्त्र⚜️ 

     "हे घ्या आई तीन हजार, ठेवा तुमच्याकडे." हे नवीन सुनबाई ऑफिसला जाताजाता अगदी सहज म्हणाली आणि सासुबाईंचे डोळे भरून आले.
"मला कशाला ग एवढे लागतात ? "
"अहो, दिवस भर किती गोष्टींना पैसे लागतात बघतेय न मी एक महिन्यापासून. दारावर भाजी, फळवाले येतात. कधी कामवाली 
जास्तीचे पैसे मागते. शिवाय तुमची भिशी असते, राहुद्या तुमच्याजवळ."
" अग, पेन्शन मिळते तुझ्या सासऱ्यांची. ते असतांना त्यांच्याकडे मागत असे, आता न मागता महिन्याच्या महिन्याला सरकार देते." 
सासु हसून म्हणाली .
"तुम्ही भिशीच्या ग्रुप बरोबर सिनेमा, भेळ पार्टी, एखादं नाटक असे कार्यक्रम ठरवत जा. जरा मोकळं व्हा आई. ह्यांनी सांगितलंय मला 
तुम्ही किती त्रासातून कुटुंब वर आणलंय ते.  मोठे दादा तर वेगळे झालेत, ताई सासरी खूष आहेत. मग तुम्ही पण आता आपलं जग निर्माण करा. मला माहितेय तुम्ही तुमच्या अनेक इच्छा दाबून टाकल्यात. आता जगा स्वतःसाठी."
"इतक्या लहान वयात हे शहाणपण  कुठून आलं ग तुझ्यात ?"
"मी दहा बारा वर्षांची असेन. आजी आत्याकडे निघाली होती. आईने पटकन सहाशे रुपये काढून हातावर ठेवले. म्हणाली , तिथे नातवंडांना बाहेर घेऊन जा, 'आजी कडून'  म्हणून काही खाऊ पिऊ घाला,  खेळणी घेऊन द्या .आजी आईच्या गळ्यात पडून गदगदून रडली होती.
'एव्हढे पैसे कधी मोकळेपणाने खर्चच केले नाहीत ग'  असे म्हणाली होती.
तेव्हापासून आजी आणि आई जश्या जिवलग मैत्रिणीच झाल्या . ......
आई, मला माहितेय, घरचे खटले सांभाळायला तुम्हाला तुमची नोकरी सोडावी लागली न? किती वाईट वाटलं असेल . किती मन मारावं लागलं असेल ....शिवाय प्रत्येक लहान मोठ्या घरच्याच खर्चासाठी नवऱ्यापुढे हात पसरावे लागले असतील. तेव्हा नवरे देखील उपकार केल्यासारखे बायकोच्या हातात पैसे ठेवत ..........
तुमची पेन्शन राहुद्या आई. मला कधी कमी पडले तर मी तुमच्याचजवळ मागेन." 
"अग, सगळं आजच बोलणार आहेस का? जा आता तुला उशीर होईल. "
"मला बोलू द्या आई. हे मी माझ्या समाधाना साठी करतेय. 
आई म्हणते, की अठरा तास घरात राबणारी बाई कुणाला कधी समजतच नाही. तू मात्र तुझ्या सासूच्या कष्टाची कायम जाणीव ठेव . प्रेम पेर, प्रेमच उगवेल." 
सासुने भरल्या मनाने सुनेच्या गालावर थोपटले . ती दिसेनाशी होई पर्यंत दारात उभी असतांना तिच्या मनात आले, सून आल्यावर 
मी आणखीनच घरात अडकेल असे वाटले होते. तू उलट  कवाडं उघडून मला बाहेरचे मोकळे आकाश दाखवलेस. ज्या घरात लेकी सुना सासुचा खळखळून हसण्याचा आवाज येतो त्या घरात वास्तुदोष नसतो. 

असा प्रत्येक घरात सासू अन सुनेमधे बदल झाला तर.....

तात्पर्य:- जेथे असेल आपुलकी आणि प्रेम जिव्हाळ्याचे अस्र तेथे फिके पडते वास्तुशास्त्र.