⚜️नाती....⚜️

⚜️नाती....⚜️

     नाती का जपायला हवीत? मुळात हा प्रश्न पडूच नये. पण आजकाल नात्यांचा जो बाजार झालाय. त्या मुळं लिहावं वाटलं...
    मुळात नातं हे माणूस जातीला मिळालेलं सगळ्यात मोठं वरदान आहे. आपण कधीही ऎकलय का हो हा हत्तीचा मावसभाऊ आहे. हा सापाचा चुलतभाऊ आहे. ही मगरीची मावशी आहे.ती उंटाची बहीन आहे.अन तो विंचवाचा मामेभाऊ आहे. नाही कुठेच ऎकायला अन बघायला असं मिळणार नाही कारण नाती फक्त मनुष्यधर्मासाठीच बनलियत. 
   आईपासून सुरु झालेला नात्यांचा प्रवास अगदी रक्ताची नसणाऱ्या पण तरीही प्रिय अशा नात्यांपर्यंत पोहोचलाय. पण काय झालयं माहीत नाही. आज प्रत्येक नात्यात कुठे ना कुठे तरी एक प्रचंड खोल दरी तयार झालीय. कोणत्या ना कोणत्या कारणानं ही वरदान म्हणून मिळालेली नाती मातीत मिसळताना दिसत आहेत. एकेकाळी अनोळखी वाटसरूलाही काय हवं नको विचारणारी माणूसकी आज स्वतः च्या माणसांना उपाशी मारताना अजिबात कचरत नाहीत. किड्या-मुंगीसारखी आपलीच माणसं आपल्याच माणसांना चिरडताना दिसतायत. रक्ताचे पाट वाहू देतायत. नक्की काय चुकलय, कुठं चुकलय. कोणीही विचार करताना दिसत नाहीय.
     मोठ्या भावानं बंगला बांधला तर बारक्याला आनंद व्हायला हवा धाकट्याच्या प्रगतीवर मोठ्याला अभिमान वाटायला हवा. पण परिस्थिती फार विरूद्ध आहे. का एवढे द्वेष वाढत चाललेत कळत नाही.बायकोची प्रगती काही ठिकाणी पतीला रुचत नाही किरकोळ कारणं घटस्फोटावर जाऊन थांबतायत.
     खरच इतकी टाकाऊ झालियत का नाती...माणसं ?
   आपल्याच माणसांवर शब्दांचे घाव घालून त्यांच्या काळजाचे तुकडे किती सहज करतायत माणसं. का अन कशासाठी? भगदाड पडण्याआधी समजुतीचे धागे का शिवून घेत नाहीत. का सांधत नाहीत तुटण्याआधी सगळं काही. ना हा सुखात ना ती. ना कसलाही शेवट गोड तरीही माणूस हटून बसतो. मी नाहीच पुढाकार घेणार त्याला, तिला गरज असेल तर बोलेन. का असा अट्टाहास असावा? कुणीतरी पुढे मागे व्हावं लागतं. मायेची ओल एकदा सुकली की नात्याचं झाड कोसळून जातं शेवटचं मातीत मिसळून जातं. समजुतीचे पुल बांधावे लागतातच नाही तर रस्त्याची दोन टोकं कधीही जुळताना दिसणार नाहीत. प्रत्येक नातं महत्वाचं आहे. बोट पकडून एक एक पाऊल चालायला शिकवणारे आई - वडिल म्हातारपणी नकोसे होऊच कसे शकतात. स्वतःच्या वाट्याचं खुप काही आपल्याला दिलेलं बहिण परकी कशी काय होऊ शकते?
     स्वतःचं सगळं काही माहेरला सोडून आलेली बायको नकोशी का होते. ज्याला त्याच्या आई-वडिलांना तळहातावरल्या फोडासारखं जपलेलं असतं, त्याला त्याच्याच आई-वडिलांपासून दुर करताना तिला काहीच कसं वाटत नाही. फक्त सण म्हणून त्याला राखी बांधायची नसते हो फक्त.
      हल्ली सगळं काही चायनीज गोष्टींसारखं झालयं. थोडाच वेळ वापर अन नंतर केराची टोपली. भावना प्रेम ओलावा सगळं काही आटत चाललय. रंगबिरंगी नोटा अजून मोठी कारणं या सगळ्याची हे वेगळचं. खरच!
     प्रत्येकानं आत्मपरिक्षण करावं असा विषय. अजून तरी नाती सांभाळताना लोकं दिसतायत. पण अशीच परिस्थिती राहिली तर माणसे एकटी पडत जातील. नावालाही नाती शिल्लक उरणार नाहीत. नावापुढे फक्त नाव लागले जाईल बस्स या व्यतिरिक्त काहीच नसेल. पण खरं सांगू. नाती आहेत म्हणूनच आयुष्यात आनंद आहे. आयुष्याला अर्थ आहे. आयुष्यात सोहळा आहे. आयुष्याला बहर आहे. जगण्याला बळ आहे. म्हणूनच नाती जपायला हवीतच. चार दिवसांचे आयुष्य चाळीस चारशे दिवसांवर न्यायची ताकत नात्यांमध्ये असते.. आहे..असेल... म्हणूनच नाती कायम जपावित अन दुसरी कुणाची तुटत असतील तर ती वाचवावीत. 
    नात्यांचे गुलमोहर कायम बहरलेले दिसावेत. आयुष्यांचा पारीजातक सुगंधानं न्हावून जातो, मग सगळ्यांच्या नाते संबंधाचा झरा अक्षय वाहतो त्यानं. म्हणूनच जपावित नाती अगदी सगळी... अन तीही कायमच...अन तीही प्रत्येकानच....

⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
babanauti16.blogspot.com  
📞9421334421