⚜️रद्दी⚜️
रद्दी शेवटी रद्दीच असते,
वस्यांची असो की पुस्तकांची,
प्रश्नपत्रिकांची असो की उत्तरपत्रिकांची,
दैनिकांची असो की नियतकालिकांची,
एकदा गरज संपली, की सर्वांची रद्दीच होते,
हे मात्र हमखास.
"आजचं वर्तमानपत्र म्हणजे उद्याची रद्दी"
असं कुणी विचारवंत म्हणतो.
वर्तमानपत्र कुठलंही असो,
स्थानिक वा प्रादेशिक,
राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय,
सकाळी सर्वांना हवंहवंसं वाटतं,
सायंकाळी मात्र रद्दी होऊन कोनाड्यात दिसतं.
जे सकाळी स्वीकारतो ते सायंकाळी अव्हेरतो.
वाचून संपवलं एकदा,
की जाहिराती अन् बातम्यांसह
दिवसभर झालेलं प्रबोधन मात्र सोयीस्कर विसरतो.
संपादकांच्या अग्रलेखांनाही नाकारतो.
हे मात्र हमखास.
अभ्यासक्रम बदलतो अन् जुन्या पुस्तकालाही
गल्लीतला भंगारवाला दारात येऊन साद घालतो
दहा रुपयांच्या पुस्तकाचं सहजच
पन्नास - पंच्याहत्तर पैशात मोल करतो.
साहित्य कला अन् ज्ञान-विज्ञानाचा
आठ- दहा वर्षांचा सुखद प्रवास
लागलीच संपुष्टात येतो.
एकदा गरज संपली, (की वैद्य मरतोच ना...!)
मग गद्य काय, पदय काय,
ज्ञान काय, विज्ञान काय,
एकूणच सगळं नकोसं होतं अन्
अभ्यासक्रमाचीच रद्दी होते,
हे मात्र हमखास.
कागद जीर्ण होतात अन् छपाई पुसट होते,
पण त्यातल्या विचारांचं काय ? अक्षर वाङ्मयाचं काय ?
ते तर शास्वत असतं, चिरंतन असतं,
त्यांना वार्धक्याचा शाप नसतो अन् मरणाचं भय नसतं.
पण विचारच जेव्हा नकोसे होतात,
तेव्हा वह्या-पुस्तकं, दैनिकं-नियतकालिकं सगळे सगळे
दलालांच्या बाजारात लिलावात निघतात,
घेणारा अधीर अन् देणारा अस्वस्थ होतो,
एकदा गरज संपली, की विचारांचीही रद्दीच होते,
हे मात्र हमखास.
आयुष्याचं तरी वेगळं काय होतं,
बालपण कोमेजतं, तारुण्य सरतं,
अपवाद खेरीज केल्यास वार्धक्य अटळ ठरतं,
धनदौलत, जमीनजुमला, बंगला गाडी सारं शून्य होतं,
रिकाम्या ओंजळीलाही पेलवत नाही मग ऐश्वर्याचं ओझं.
वय हळूहळू निसटतं
अन् लक्षात जेव्हा येतं खूप काही राहिल्याचं,
बरंच काही न पाहिल्याचं, तेव्हा जगणं छळू लागतं.
सुरकुतलेल्या मनावर नकळत निराशेच मळभ दाटतं.
आपल्या माणसांत राहूनही परकं झाल्यासारखं अन्
भरल्या घरात राहूनही पोरकं झाल्यासारखं वाटतं.
एकदा गरज संपली,
की आयुष्याचीही रद्दीच होते,
हे मात्र हमखास.
- वसंत गणपतराव जाधव.
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
babanauti16.blogspot.com
📞9421334421