⚜️गणपतीची मूर्ती कशी असावी?⚜️

 ⚜️गणपतीची मूर्ती कशी असावी?⚜️ 

      घरगुती गणपतीची मूर्ती शक्यतो सात ते नऊ इंच पेक्षा जास्त उंच नसावी. मूर्ती शक्यतो ही मातीची आणि सुबक, सुंदर आणि प्रसन्न वदन असणारी असावी. वेगवेगळ्या आकारातील पक्षी, प्राणी किंवा देवदेवतांच्या स्वरूपात मूर्ती असू नये.

अथर्वशीर्षमध्ये एका श्लोकात मूर्तीचे वर्णन केले आहे.

एकदंतच चतुरहस्तं पाशमंकुश धारिणम ।
रदं च वरदम हस्तैर बीभ्राणं मुषकध्वजाम । 
रक्तम लम्बोदरं , शूर्पकर्णकम रक्तवाससम । 
रक्तगंधानुलीप्तागं रक्तपुष्पे:सुपुजीतम ।। 
  •  गणेशाची मूर्ती ही एकदंत असावी. 
  • मूर्तीचे कान मोठे असावेत. 
  • त्या मूर्तीला चार भुजा असाव्यात. या चारही भुजा एकमेकांना  चिकटलेल्या नसाव्यात. वरच्या दोन हाता पैकी एक हातात पाश आणि दुसऱ्या हातात अंकुश असावा. हे दोन्ही हात कानाला चिकटलेले नसावेत. खालच्या दोन्ही हातातील एक हात हा वरदहस्त किंवा अभय मुद्रेत असावा आणि दुसरा हात हा प्रसाद ग्रहणाचा असावा. अभयमुद्रेचा हात हा समस्त भक्तांना वरदान देणारा तर प्रसादाचा हात हा सगळ्यांच्या पोटा-पाण्याची व्यवस्था करणारा असतो.
  • मूर्तीच्या डोक्यावर मुकुट जरूर असावा. उघड्या डोक्याची मूर्ती बसवू नये. मुकुटाच्या मागे मूर्तीची शोभा वाढवण्यासाठी आजकाल प्रभावळ असते, ती गोल सुबक असेल तर उत्तम पण विचित्र किंवा त्याला वेगवेगळे आकार असलेली बिलकुल नसावी.
  • मूर्ती ही लंबोदर असून ती रक्तवर्णीय असावी. 
  • मूर्तीच्या पायापाशी गणपतीचे वाहन मूषक जरूर असले पाहिजे. 
  • मूर्ती ही बैठी आसनस्थ लोडाला टेकून बसलेलीच असावी. 
  • गणेशाला पितांबरचं नेसलेलं असावं.
  • मूर्ती ही एक पाय आसनाखाली खाली सोडून दुसरा पाय दुमडून आरामशीर बसलेली असावी.
  • बाप्पा आपल्या घरी पाहुणे म्हणून आलेले असतात तेंव्हा ते आरामशीर बसलेलेच असावेत, उभे किंवा नाचताना नकोच.
  • मूर्तीच्या समोर बाप्पाचे वाहन उंदीर हा जरूर असावा. 
  • मूर्ती घरात आणल्यावर बाप्पाला घरभर फिरवून आपले सगळे घर दाखवावे.
  • भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गजाननाची स्थापना करावी.
  • गणपतीची स्थापना करण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नसते. स्वतः गजानन हा विघ्नहर्ता आहे. तो स्वतःच एक मुहूर्त आहे. त्यामुळे त्याच्या स्थापनेसाठी स्वतंत्र मुहूर्ताची गरज नाही.
  • चौरंगावर किंवा पाटावर स्वच्छ वस्त्र मांडून त्यावर मूठभर तांदूळ पसरवून गोल आसन तयार करावे, त्यावर कुंकवाने छोटे स्वस्तिक काढुन त्यावर मूर्तीला व्यवस्थित स्थानापन्न करावे. मनोभावे पूजा करून गणेशाला हार, फुले, दुर्वापत्री वाहून स्थापना करावी. गणपतीला लाल फुले जास्त आवडतात. मूर्तीची स्थापना झाल्यावर मूर्तीला चुकूनही हलवू नये.
  • मूर्ती आणताना किंवा स्थापना करताना काही तोडमोड झाल्यास तशीच भंगलेली मूर्ती स्थापित करू नये. अशी मूर्ती भंगली असेल तर नैवेद्य दाखवून ती मूर्ती विसर्जित करावी व नवीन मूर्तीची स्थापना करावी.
  • जितके दिवस गणपती बाप्पा घरी असतील तितके दिवस रोज सकाळ संध्याकाळ आरती केली गेली पाहिजे. गुडघ्याच्या खाली जमिनीवर मूर्तीची स्थापना केली असल्यास आरती करणाऱ्याने बसून आरती करावी व बाकीच्यांनी उभे रहावे. आरती आणि मंत्रपुष्पांजली अगदी सावकाश, सुस्पष्ट, खड्या खणखणीत आवाजातच म्हंटली गेली पाहिजे. घाईघाईने, अस्पष्ट, तोंडातल्या तोंडात आरती म्हणू नये.
  • बाप्पाला काहीही नैवेद्य चालतो. अगदी तुमच्या घरात केलेली साधी भाजी पोळी किंवा वरणभात हा सुद्धा नैवेद्य म्हणून चालतो.
  • घरात बाप्पा असताना घरात भांडणतंटे, वादविवाद करू नये. मांसाहार, मद्य, जुगार, व्यभिचार इत्यादी पासून या दिवसांत लांब असावे.
  • गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर काही सुतक लागल्यास किंवा घरातील कोणी दगावल्यास शेजारी किंवा मित्र यांच्याहस्ते नैवेद्य दाखवून मूर्ती विसर्जन करावी.
  • गणपती हा आनंद, सुखं, विद्या, आरोग्य आणि ऐश्वर्य देणारा विनायक आहे. मनापासून केलेली कुठलीही पूजा त्याला भावते. मनःपूर्वक त्याची आराधना करा. त्याचा आशीर्वाद  सदैव पाठीशी असेल...

⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
babanauti16.blogspot.com  
📞9421334421