⚜️पुस्तक परिचय - सारं काही मुलांसाठी⚜️
लेखक - श्रीम. शोभा भागवत
भावी पिढीला आकार देताना ...पालकांना समृद्ध बनविणारे पुस्तक –सारं काही मुलांसाठी
धावणाऱ्या जगासोबत धावणारा मध्यमवर्गीय पालक मुलांना घडविताना मुलांमध्ये असणाऱ्या क्षमतांचा विचार करतच नाही. स्वतःची स्वप्ने,स्वतःच्या इच्छा ,आकांक्षा मुलांवर लादताना नकळतपणे त्यांचे बालपण हिरावून घेत आहोत याची पुसटशी जाणीवही होत नाही.घरातही स्पर्धा ,घराबाहेर ही स्पर्धा ,या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहण्याची पालकांची आणि पर्यायाने मुलांची केविलवाणी धडपड,हे आजचे चित्र सगळीकडे सारख्याच प्रमाणात दिसते.स्पर्धा ही फक्त जिंकण्यासाठीच असते हा चुकीचा गैरसमज पालकांच्या मनावर कोरलेला असतो.बाहेरची प्रस्थापित व्यवस्था यासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत असते.पालकांच्या रोजच्या जगण्यातले ताण-तणाव हे फक्त त्यांचेच राहत नाही तर घरातील मुलं देखील त्यामुळे प्रभावित होतात.म्हणूनच मुलांची निरागसता सांभाळून त्यांना फुलवावे कसे? मुलाचं ‘मूलपण’ जपत,विविध मूल्यांची रुजवणूक करताना आनंद निर्मिती ,कामातलं समाधान,नात्यांची गरज,निसर्गाशी नातं, अशा अनेक गोष्टीवर प्रकाश टाकत सुजाण पालकत्व समजून सांगताना स्वतःचे अनुभव बालभवनाच्या संचालिका शोभा भागवत यांनी ‘सारं काही मुलांसाठी’ या पुस्तकात साध्या सोप्या भाषेत सांगितले आहे.साकेत प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेले हे पुस्तकातील सुजाण पालकत्वाच्या या गोष्टी प्रत्येक पालकास उपयोगी पडतील अशाच आहेत.शिक्षण परिषदेच्या निमित्ताने केलेले हे पुस्तक परिचय .....
मुलांपालकत्व म्हणजे केवळ संगोपन नाही,किंवा जबाबदारी नाही तर ती एक कला आहे.ही कला अवगत होण्यासाठी पालकांचे प्रशिक्षण ही संकल्पना सध्या मूळ धरू लागत आहे.पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती.एकत्र कुटुंबात अनेक संस्कार व मूल्ये नकळतपणे मुलांमध्ये रुजली जायची.त्यात नात्यांची उब असायची,निसर्ग सोबतीला असायचा.भौतिक सुविधा नसल्यामुळे कष्टाचा अनुभव असायचा.यामुळे मुलांमध्ये जगण्याचा आत्मविश्वास ओतप्रोत भरलेला असायचा नव्हे ओसंडून वाहायचा.काळ बदलला तशी माणसे बदलली.विभक्त कुटुंबात ना जिव्हाळा राहिला नाते आपलेपणा.नात्यांमधला ओलावा नाहीसा झाला.मध्यमवर्गीय माणसाला भौतिक सुविधांच मृगजळ खुणावत राहील आणि तो त्यामागे धावू लागला.या धावपळीत स्पर्धा हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला.सगळीकडे नुसती स्पर्धाच स्पर्धा. मुलांना वाढविताना देखील ही स्पर्धा सोबत राहते.त्यात मुलाचं बालपण करपून जात हे पालकाच्या ध्यानातही येत नाही.हीच मुले मोठेपणी कोरडी होतात तेव्हा वेळ गेलेली असते. म्हणूनच लेखिका म्हणतात मूल जस गरिबीत बिघडू शकत तस आणि तितकच समृद्धीतही बिघडू शकते.त्यामुळे पुढची पिढी घडवण्यासाठी सुजाण पालकत्वाची गरज आहे.
काळानुसार संस्कार देखील बदलत जातात.आजच्या मुलांना सगळ जाग्यावर आणि तयार मिळत.कुठेच शारीरिक कष्ट नाही.नकाराची सवय नाही.हवं ते हवं तेंव्हा मिळत त्यामुळे इतर गोष्टींचा विचार त्याच्या मनाला शिवत नाही.अशा वेळी कामातला आनंद,निर्मितीतील गंमत,त्यातून निर्माण होणारा आत्मविश्वास,नकार ऐकण्याची सवय, यश आणि पचविण्याची ताकद हे संस्कार जाणीव पूर्वक मुलांना द्यावे लागतील जे पूर्वी आजूबाजूला मिळत होते.आज पालक मुलांना घराबाहेर पडू देत नाही तर बाहेरच जग अनुभवणे वेगळीच गोष्ट आहे.
ज्ञमुलांना पालकांचा वेळ हवा असतो.जो पालक देवू शकत नाही.पालकांनी मुलांसाठी काढलेला वेळ म्हणजे मुलांच्या व्यक्तिमत्वविकासाची पायाभरणीच होय.बंदिस्त वातावरणात वाढलेल्या मुलांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव कमतरता असते त्यामुळे ही मुले सर्वार्थाने स्वार्थी होतात.फक्त स्वतःसाठी जगायचं या कोशातून ते बाहेर पडतच नाही.मुलांची जडणघडण ही घरातून होत असते.मुलांना फक्त पालकांचं प्रेम पुरेसे नसत तर त्यांना सन्मान देखील हवा असतो.आजकालची पालक मुलांच्या प्रत्येक गोष्टीत तुलना करत असतात जे मुलांना नको असते.प्रत्येक मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्व असते.दुसऱ्या सोबत केलेल्या तुलनेने मुले आतून दुखावतात.त्यांच्या मनावरचे हे ओरखडे त्यांना दाखवता येत नाही.पालकांच्या अपेक्षांचं ओझ बऱ्याचदा त्यांना झेपत नाही.
मूल पालकांच्या,शिक्षकांच्या डोळ्यात आपली स्व-प्रतिमा पाहतात.त्यामुळे त्यांना विश्वासात घेवून केलेल्या कामाबद्दलची प्रशंसा करायला हवी.प्रत्येक मूल अभ्यासात हुशार असेल असे नाही.प्रत्येकात एक वेगळी आवड आणि कला दडलेली असते ती आवड ओळखता आली पाहिजे. ‘तारे जमीं पर’ मधील ईशान घरातल्या वागणुकीने हैराण होतो मात्र एका टप्प्यावर त्याच कौतुक करणारे शिक्षक त्याच्या आयुष्यात बदल घडवून आणतात हे खर पालकत्व आहे.मूल ऐकत नसतील चिडचिड करत असतील तर त्यांच्यावर जबाबदारीच काम सोपवावे त्याच्या कामाबद्दल कौतुक कराव त्याच्यातील बंडखोर वृत्तीत नक्कीच सकारात्मक बदल होताना दिसेल.
आपण मुलांशी जे हितगुज करतो त्यांच्याशी जसे वागतो ते त्यांच्या मनावर खोलवर रुजतं.ही जाणीव आपल्याला त्यांच्याशी वागताना बोलताना ठेवली पाहिजे.मुलांकडे इतके लक्ष देवू नये की त्याचं स्वातंत्र्य हिरावलं जाईल आणि इतकही दुर्लक्ष करू नये की मुले हाताबाहेर जातील.मुलाचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी पालकांनी वेळ देण आणि योग्य वेळी दुर्लक्ष करण तितकच महत्वाच आहे.प्रत्येक मोठ्या व्यक्तीला सन्मान हवा असतो इतरांनी आदराने वागवावे ही अपेक्षा असते अगदी तसेच लहान मूल देखील या गोष्टीसाठी आसुसलेले असतात.म्हणूनच मुलांचा सन्मान जपण आणि त्यांना आदराने वागवण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे ही समज दृढ होणे गरजेचे आहे.मुलांच्या प्रत्येक चुकांसाठी शिक्षा करणे योग्य नाही क्षमाशील वृत्तीने मुलांमधील वाईट सवयी बदलता येतात.ज्या गोष्टीत मुलांना आनंद मिळतो अशा गोष्ठी मुलांना करू द्याव्या.यातून त्यांची सर्जनशीलता वाढते सोबत स्वतंत्रपणे विचार करण्याची सवय लागते.एखादी गोष्ट लादणे आणि स्वतःहून करणे यात मोठा फरक असतो.आयुष्यातील साचलेपण दूर करून सतत प्रवाहित राहणे ही मुलांच्या भवितव्यासाठी खूपच महत्वाची बाब आहे.
यशाची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असते.खर तर यश ही वृत्ती असते.मी चांगला माणूस आहे माझ्यात अनेक क्षमता आहे हे समजणे लहानपणापासून समजणे गरजेचे आहे.आयुष्याच्या वेगळ्या वाटा निवडण्याच स्वातंत्र्य मुलांना जरूर द्याव मात्र त्यासोबत जबाबदारीची जाणीव करून द्यावी.गाडीची किंवा वस्तूंची सर्विसिंगची गरज आपण ओळखतो कारण त्यामुळे त्या दीर्घकाळ टिकू शकतात मात्र नात्याच्या सर्विसिंगच काय? नातं दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यातला ताजेपणा,त्यातला ओलावा रहाण्यासाठी ह्या गोष्टींची गरज असते हे आधी पालकांना अवगत होणे गरजेचे आहे तरच ते मुलांमध्ये प्रवाहित होऊ शकेल.संवाद हा कोणत्याही नात्याचा आत्मा असतो.नात्यांमध्ये ताण-तणाव नसतो ,लपवाछपवी नसते,दिखाऊपणा नसतो,ज्या नात्यात उबदारपणा मिळतो अशी नाती टिकवली पाहिजे हे संस्कार त्यांच्यात ओतणे ही सुद्धा आजची एक गरज बनली आहे.
अलीकडच्या काळात संस्कार ही फक्त शाळेची जबाबदारी असा समज दृढ होत आहे.जशी शाळा ही मुलांच्या जडणघडण करते तशी घर,कुटुंब,समाज देखील महत्वाचा आहे.या सर्वांमुळे मुलांच्या व्यक्तिमत्वाला साजेसा आकार येतो.प्रत्येक मूल म्हणजे एक फुलपाखरू असते त्याला स्वच्छंदपणे बागडायचे असते मात्र शाळा,पालक,शिक्षक त्याला मुक्त संचार करू देत नाही,त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो.सक्तीतून भक्ती नाहीशी होते.भक्तीला सक्तीची गरज नसते त्यामुळे सक्ती पेक्षा भक्ती निर्माण करणे महत्वाचे आहे.
‘सारं काही मुलांसाठी’ या पुस्तकाच्या लेखिका शोभा भागवत चाळीस वर्षाहून अधिक काळ मुलांसाठी काम करत आहेत.या दीर्घकाळात त्यांनी जे अनुभवल ते पुस्तकरूपाने पालकांसमोर ठेवल्याने ते केवळ पुस्तक राहत नाही तर ते अनुभवांनी दिलेले शहाणपण आहे म्हणूनच ते पालकांना आपलस वाटत.आजच्या काळात मुलांना घडविताना आणि वाढविताना जे द्यायला हवं आणि जे टाळायला हवं ते सारं पुस्तकात आलेले आहे.बालभवन मधील त्यांचे प्रयोग हे अनुकरणीय आहेत.त्यांनी मुलांसाठी आणि पालकांसाठी लिहिलेलं विपुल साहित्य आजच्या काळाशी सुसंगत आणि एकरूप होणार आहे.पालकत्व हे एक शास्त्र आहे.ती एक कला आहे.आपली पाल्याच्या उज्वल भवितव्यासाठी आनंदाचा अभ्यास आहे.जे पालक ही कला आत्मसात करतील त्यांची मुले नक्कीच उत्तुंग भरारी घेतील.या पुस्तकातील शब्दांना अनुभवाची धार आहे हे शब्द,केवळ शब्द न राहता रोजच्या जगण्याचा भाग होतात.हे शब्द मार्ग दाखवतात तसे आधार देतात.आणि आपल्या चुकांसोबत ते सुधारण्याची संधीही देतात.मुलांच्या शरीराला आकार देताना ते मुलांच्या मनालाही आकार देतात.म्हणूनच प्रत्येक पालकाने,शिक्षकाने वाचावं अस हे पुस्तक आहे.