⚜️पुस्तक परिचय - अदम्य जिद्द⚜️
अनुवाद - श्रीम. सुप्रिया वकील
स्वप्न-विचार-कृती हे तत्वज्ञान प्रत्येक विद्यार्थ्यांत रुजवायचे आहे-डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
स्वप्न पहा...त्या स्वप्नांच्या मागे धावताना प्रतिकूलतेवर मात करीत ध्येयप्राप्ती पर्यंत थांबू नका हा विचार आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जगणारे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम प्रत्येक भारतीयाचे स्फूर्तिस्थान आहे.देशासाठी अवघं आयुष्य समर्पित करताना त्यांच्या प्रत्येक भूमिकेत विकसित भारताचे स्वप्न आहे.या स्वप्नांना आकार देताना विविध प्रसंगी केलेले भाषण,संवाद,चर्चा,अनुभव यांचे संकलन म्हणजे ‘अदम्य जिद्द’ हे पुस्तक.भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी मूळ इंग्रजीत लिहिलेल्या पुस्तकाचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केलेला आहे.रामेश्वरच्या सागरतीरापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या एक चिंतनशील विचारवंत,वैज्ञानिक,शिक्षक,राष्ट्रपती अशा अनेक भूमिका प्रेरणादायी आहेच त्यासोबत रक्तात भिनलेली मूल्ये जपताना एक ज्ञानोपासक देशभक्त म्हणून त्यांचा आदर्शवत जीवन या पुस्तकाच्या रूपाने दिशादर्शक ठरेल.मेहता पब्लिशिंग हाऊस ने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचा शिक्षण परिषदेच्या निमित्ताने केलेला पुस्तक परिचय ...
स्वातंत्र्योत्तर कालखंडात मोजक्या थोर व्यक्तिमत्वांनी भारतीयांच्या हृदयात आपल्या कर्तुत्वाने स्थान मिळवले व कायस्वरूपी ते अबाधित ठेवले.या मोजक्या व्यक्तिमत्वातील खूप वरचे नाव म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम.प्रत्येक भारतीयांचे प्रेरणास्थान बनताना ना त्यांची जात आडवी आली ना धर्म.भाषा,प्रांत,वर्ण,राजकारण आदी सर्व भेदांच्या सीमा ओलांडून ते प्रत्येक देशवासियांचा नव्हे तर अवघ्या जगाचे आदर्श बनले.भारताची महत्वाची क्षेपणास्त्रे तयार करून कार्यान्वित करणारे शास्रज्ञ ‘मिसाईल मन’म्हणून लोकप्रिय आहेतच त्यासोबत देशातील अणुचाचण्या घडविण्यात त्यांचा महत्वाचा वाटा राहिलेला आहे. ‘टेक्नॉलॉजी व्हिजन-२०२०’तयार करून देशाला प्रगत राष्ट्राचे केवळ स्वप्न दाखविणारे नव्हे तर ते वास्तवात उतरविण्यासाठी आयुष्य पणाला लावणारे कलाम प्रत्येक भारतीयाचा अभिमान बनले.पद्म पुरस्कारांसह ‘भारतरत्न’ या देशातील सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित झालेले डॉ.कलाम देशाचे अकरावे राष्ट्रपती झाले.जगातील पंचेचाळीस पेक्षा अधिक विश्वविद्यापिठे व संस्थांकडून मानद डॉक्टरेट प्राप्त डॉ.कलाम राष्ट्रपती पदावरून पायउतार झाल्यावरसुद्धा पुन्हा पूर्वीच्या शैक्षणिक ,सामाजिक जीवनात तितक्याच कार्यक्षमतेने वावरले.अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या कलामांनी लिहिलेल्या साहित्यातून अनेक पिढ्या मार्गदर्शन घेतील अशी साहित्य संपदा निर्माण केली.जागतिक कीर्तीचे व्यक्तिमत्व असलेल्या कलामांचे संपूर्ण जीवनप्रवास,त्यांची जडणघडण,राहणीमान,त्यांनी लावलेले शोध,विविध ठिकाणी दिलेली व्याख्याने,त्यांचे आचार-विचार,त्यांचे सानिध्य,संवाद,चर्चा ,दृष्टीकोन,चिंतन सर्वकाही विश्वव्यापक व प्रेरणादायी आहे.हे सर्व काही या पुस्तकाच्या प्रत्येक पानात आणि प्रत्येक शब्दात ओसंडून वाहते.
प्रत्येक महान व्यक्तिमत्वाची जडणघडण होते ते त्यांच्या आयुष्याच्या प्रवासातील स्फूर्तीदायी लोकांच्या सहवासामुळे.स्पुर्तीदायी व्यक्तित्वे रेखाटताना पहिल्याच प्रकरणात भेटते आपल्याला लेखकाची आई.प्रेम आणि सदहृदयाचं प्रतिक असलेल्या आईच वर्णन करताना आईला दैवी स्रीची उपमा देतात.स्रीत्व ही परमेश्वराची एक सुंदर निर्मिती आहे हे सांगताना आणखी एका आई इतक्याच थोर व्यक्तिमत्व त्यांच्या आयुष्यात आले ते म्हणजे कर्नाटक संगीताची जननी भारतरत्न एम.एस.सुब्बलक्ष्मी.मातापिता,गुरुजन यांच्या सोबतच लेखकाला स्फूर्ती देणाऱ्या व त्यांच्या आयुष्यावर प्रभाव असणारे पाच शास्रज्ञ विक्रम साराभाई,सतीश धवन,ब्रह्म प्रकाश,एम.जी.के.मेमन,आणि डॉ.राजा रामण्णा.या सर्वांच्या सानिध्यात खूप काही शिकायला मिळालं.
डॉ.कलामांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या शिक्षकांचा उल्लेख प्रसंगासह वाचनीय आहे.माझे शिक्षक या प्रकरणात शिक्षकाची भूमिका आणि जबाबदाऱ्या सांगताना त्यांच्यात कोणते गुण असावे हे देखील विशद केले आहे.ते म्हणतात शिक्षक हा कोणत्याही देशाचा कणा असतो,जणू आधारस्तंभ...या आधारस्तंभावरच सगळ्या आशा आकांक्षा वास्तवात रुपांतरीत होतात.शिक्षकांवर असणारी विशेष जबाबदारी म्हणजे तरुणांची मने प्रज्वलित करणे.प्रज्वलित मन हा पृथ्वीवरील,पृथ्वीच्या वरच्या स्तरावरील तसेच पृथ्वीच्या पोटातील सर्वात सामर्थ्यवान साधनस्रोत आहे.शिक्षक हे देशातील सर्वोत्तम विचारवंत असले पाहिजे.विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्र उभारणीच्या क्षमता निर्माण करणे हे अध्यापनाचे उद्दीष्ट असते. आधुनिकतेची कास धरताना तंत्रज्ञानाचा वापर अध्यापनात करावा असा आग्रह ते धरतात.
उद्याचा विकसित बलशाली भारत हा आजच्या तरुणांमध्ये आहे.मुले ही आपली मोठी संपदा आहे.विकास प्रक्रियेत तरुणांच्या गरजा,हक्क,व अपेक्षा याकडे लक्ष पुरविण्याला प्राधान्य हवे.नागरिकांच्या जाहीरनाम्यात मुलांना मौल्यवान संपत्ती आहे हे सांगतानाच आम्ही शिक्षण व विकासाचे अधिकार यामध्ये मुलगा आणि मुलगी यांना समान महत्व देण्यास सांगितले.भारतातील तरुण वर्गाने भव्य दिव्य ध्येय ठेवले पाहिजे,किरकोळ ध्येय ठेवणे हा गुन्हा आहे.ज्ञान,मेहनत,निश्चयी दीर्घ प्रयत्न यासाठी ते आग्रही होते.केवळ प्रश्न विचारून किंवा विचार करून प्रश्न सुटत नाही तर समस्या सोडविण्यासाठी कृती देखील तितकीच महत्वाची.कठोर परिश्रम निश्चयी दीर्घ प्रयत्नांची आवश्यकता आहे.तरुणांना मार्गदर्शन करताना ते म्हणतात ‘ताऱ्यांपर्यंत पोहचता न येण्यात शरम वाटण्यासारखे काही नाही पण ताऱ्यांपर्यंत पोहचण्याचे स्वप्न नसणे ही शरमेची बाब आहे.
विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालताना दोन्हीही जनकल्याण साधणाऱ्या गोष्टी आहेत.विज्ञान अधिक चांगल्या भौतिक जीवनाचा मार्ग दाखवते तर अध्यात्म सदाचारी जीवनाचा मार्ग दाखवते.धर्म मनाला मोहून टाकणारी बेटे असतात मन आणि आत्मा यांना सत्याची प्रचिती देणारे जणू वाळवंटातील हिरवळ असतात.एका मुलीच्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ.कलाम म्हणतात ‘मिसाईल मन च्या दृष्टीने देशाला सामर्थ्य व सुरक्षा बहाल करण महत्वाचं होत तर एक राष्टपतीच्या दृष्टीने या देशातील एक अब्ज जनतेच्या चेहऱ्यावर सुहास्य असण महत्वाच आहे.
एकवीसाव्या शतकातील लोकांच्या गरजांचे स्वरुप वेगळे असणार आहे.भांडवल व श्रमशक्ती एवजी ज्ञान हा प्रमुख उत्पादन स्रोत बनला आहे.काळानुसार आपण आपल्यात बदल करायला हवा.काळानुसार जो बदल स्वीकारेल तोच आजच्या काळात टिकेल.ज्ञानाची व संस्कृतीचे रूपे आपणास डिजिटल ग्रंथालयात एकत्र आणण्याची मोहीम हाती घेणे अतिशय महत्वाचे आहे.डिजिटल ग्रंथालयाचा फायदा म्हणजे ज्ञानाचियेद्वारी सर्वांना सारखाच प्रवेश मिळतो,मग ती व्यक्ती कोणत्याही ठिकाणची,कोणत्याही जातीची,संप्रदायाची,वर्णाची वा कोणत्याही आर्थिक स्तराची असो.डिजिटल ग्रंथालय लोकांना जोडण्याचे काम करते.त्यांच्यात फाटाफूट करण्याचे नाही.या ठिकाणी भूतकाळ आणि वर्तमान यांचा संगम होतो त्यातून भविष्य आकाराला येते.
देशाच्या जडणघडणीत त्या देशाच्या देशातील नागरिकांची नैतिक मुल्ये,जीवनमूल्येव चारित्र्य प्रतिबिंबित होत असते.देश कुणाही व्यक्तीपेक्षा वा संघटनेपेक्षा मोठा असतो.जेव्हा प्रत्येक नागरिक सन्मानाने समृद्ध जीवन जगण्याइतका सबल होईल तेव्हाच देशात सुख समृद्धी व शांती नांदेल.विश्वबंधुत्वासाठी जागतिक दृष्टीकोन विकसित करण्याची गरज आहे.सुजाण नागरिकांच्या ज्ञानसामर्थ्याच्या आधारे ,विविध स्तरावर सबलीकरण करण्याच्या माध्यमातून विकसित भारताचे स्वप्न साकार होणार आहे.
या पुस्तकातील अनेक विषयावर डॉ.कलाम यांनी केलेले भाष्य देशातील तरुणांना दिशा देणारे आहे.शिक्षण,कला ,साहित्य यासोबतच मूल्ये,विज्ञान व अध्यात्म या विषयावर ते अधिकार वाणीने बोलू शकतात कारण त्यांच्या रोजच्या जगण्यातून मुल्ये ओसंडून वाहताना जगाने पाहिले आहे.विकसित भारताच केवळ स्वप्न पाहिलं नाही तर विकसित भारताच्या उभारणीत स्वतःच योगदान सुद्धा दिलेले आहे.आजचे राजकारण,समाजकारण नेतृत्व याविषयी परखड मते मांडली आहेत.देशाचे अकरावे राष्ट्रपती म्हणून वावरताना त्याचं सर्जनशील नेतृत्व देशाने अनुभवले आहे.अशा प्रकारे डॉ.कलाम यांचे या पुस्तकातून विविध भूमिका साकारणारे विचारांना कृतीची जोड देत आदर्श व्यक्तिमत्व आपल्याला प्रेरित करते. हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थी ,शिक्षक,प्रत्येक भारतीयाने वाचावे,संग्रही ठेवावे असेच आहे.