⚜️भगवान परशुराम - भाग - ७⚜️

⚜️भगवान परशुराम - भाग - ७⚜️ 

         जमदग्नी आणि रेणूकाच्या विवाहाचा उल्लेख मागच्या ४ थ्या भागात आला, पण विवाह कसा झाला याचे सविस्तर वर्णन आतां करत आहे. रेणूराजाने जमदग्नींना आपल्या राज्यात आमंत्रित केल्यावर, जमदग्नी म्हणाले, राजन् आम्ही भृगुवंशीय अंकिंचन वृत्तीचे. ज्ञानसाधना हाच आमचा धर्म. आपण नक्कीच कांही तरी हेतू मनी धरुन आम्हाला आमंत्रित करीत आहांत. बरोबर आहे महामुनी! आम्ही आमच्या उपवर कन्येसाठी जावई शोधात आहो. त्यासाठी स्वयंवराचे आयोजन करण्याचा विचार आहे. आपल्याला विनंती की, आपण स्वयंवराला उपस्थित राहावे.भृगुवंशीयां च्या आशिर्वादाची इच्छा तर साक्षात देवेंद्रानेही केली.
     आपण सत्यवतीदेवीचे सुपुत्र! आपले आजोबा कन्याकुब्ज! आपलं मातुल घराणं क्षत्रिय, म्हणजेच क्षत्रियकुलाचा आपला रक्तसंबंध! याच नात्याने आपणाला स्वयंवराचे निमंत्रण देत आहे. इश्वरेच्छा कुणाला टाळता येत नाही. येईन मी स्वयंवराला!
       भागीरथीच्या तीरावर प्रचंड मंडप उभारल्या गेला. छताला रेशमी झालरी, रत्ने, मोतींनी मंडपाचे मेखा व खांब सजवले होते. उत्कृष्ट रुजामे मंडपाची शोभा वाढवित होते, रेणू राजाच्या गुणवती कन्येचा स्वयंवर सोहळा संपन्न होणार होता. देशोदेशीचे राजपुत्र, राजे, आपापल्या इतमामा प्रमाणे स्थानापन्न झाले होते. एवढ्यात दोन तेजपुंड पुरुषांनी मांडवात  प्रवेश केला. रेणूराजा स्वतः त्यांना सामोरे जाऊन, स्वागत करत म्हणाले, महात्मन् आपण विनंतीस मान देऊन आलात आम्ही धन्य झालो. राजन हे माझे पिता महान तपस्वी रुचिक मुनी! राजाने दोघांनाही लवून वंदन केले.
       वरच्या दालनातून रेणूकाची सखी अनुराधा म्हणाली, सखी, तुझी निवड निश्चित झालीसे वाटते. एवढ्या राजपुत्रांमधे आता आलेले पितापुत्रां मधे पुत्र अधिक तेजस्वी दिसत असून त्यांचे नांव आहे जमदग्नी!
      रेणूकाचा भाऊ तिच्या कक्षात येऊन, रेणूकाला मंडपात घेऊन आला. साक्षात पार्वतीच जणूं रेणूका दिसत होती. वास्तविक ती पार्वतीच होती. पितवर्णाचे अंकुश, मोजकेच अलंकार तिच्या सौंदर्यात भर घालत होते. आपल्या कन्येचे ते सात्विक, लोभस अनुपम रुप बघून राजारेणूचे मन भरुन आले.
    रेणूका हातात चंपकाची गंधीत पुष्पमाला घेऊन पित्याशेजारी अधोमुखीत उभी होती. तिने मनोमन आपला पती केव्हाच निश्चित केला होता. आतां फक्त औपचारीकता निभावणे होते. राजा तिला म्हणाले, जो वर तुझ्या मनी असेल त्यांच्या गळ्यात वर माला घाल. सखी अनुराधा बरोबर हलके हलके पाऊले टाकीत ती महात्मा जमदग्नी बसले होते तिथे जाऊन त्यांचे गळ्यात वरमाला घातली.आणि बाजूला असलेल्या श्वशुरांना वाकून नमस्कार केला. आशिर्वाद देत म्हणाले, पुत्रवती भव! साक्षात नारायण तुझ्या उदरी जन्म घेवो.
      हे सारे इतके अकल्पित घडले की, मंडपातील सर्वजण आवाक झाले. आपल्या सारख्या राजे , महाराजें, राजपुत्र डावलून राजकन्येने एका निर्धन ऋषीच्या गळ्यात वरमाला घातली याचा त्यांंना स्वतःचा व क्षत्रियत्वाचा अपमान वाटला. संतापलेल्या राजपुत्रांनी आपापली शस्रे उपसली. क्षणापूर्वी सनई च्या मंगल सुरयुक्त मंडप आता युध्दभूमीत रुपांतर झाले. रेणूराजा व त्यांचा पुत्र सर्वांना शांतवण्याचा प्रयत्न करीत होते. पण कुणीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. या प्रकाराने गांगरलेली रेणूका अनुराधाचा हात धरुन एका कोपर्‍यात उभी होती.
    जमदग्नींनी शस्र हाती घेऊन, संतापलेल्या राजपुत्रांना शस्रानेच उत्तर दिले. साक्षात अग्निनारायण जणू त्यांचे अंगी संचारला. मुद्रा तप्त सुवर्णासारखी लाल झाली होती. सात्विक व शांत डोळ्यात अंगार  फुलला होती. ऋषीवेशातील त्या तरुणाचे शस्रलाघव पाहून सर्वजण आवाक झाले. जावयाचा पराक्रम बघून, रेणूराजा मनोमन सुखावले. ज्ञानाला पराक्रमाची जोड बघून आपल्या गुणवती कन्येला योग्य वर प्राप्त झाल्याचे बघून मनातुन सुखावले. तरी सुध्दा  विवाहा सारख्या मंगल प्रसंगी असे घडायला नको असे त्यांना वाटले. जमदग्नीने शस्र खाली ठेवले. रेणू राजाने पुढे येऊन जावयाचे स्वागत केले. विवाहसोहळा यथासांग पार पडला. आहेर म्हणून रेणूराजाने १००० गायी दिल्या. रेणूकाला मुळातच अलंकार किंवा बाह्य देखाव्याची आवड नव्हती. तरी सुध्दा राजाला शोभेल असे वस्रालंकार जावयाला व कन्येला दिले व राज्यही अर्पण केले.