⚜️आई मूर्तिमंत त्याग⚜️
आईलाही लागे ऊन, तरी सावलीच होते!
आई बालकाएवढे, नाही सर्वश्रेष्ठ नाते!
वर आग खाली वाळा, आणि मधोमध आई!
देव देव्हारा सोडून, नांदतसे तिच्या ठायी!
कुठे ठेवते अपेक्षा, उद्या जपतील पिल्ले!
शत्रूहुन जादा तीव्र, खूप जवळचे हल्ले!
आज मिटलेले तरी, उद्या उडतील पंख!
मग मागे ना येतील, हाच जिवघेणा डंख!
सूर्य पराभूत होतो, ऊन्हे येतात शरण!
राख होण्याआधी आई, जेव्हा विझवी सरण!
डोळे न्याहाळती दगा, आणि झुगारती घात!
कोणत्याही नात्यापेक्षा, आई वावरते आत!
पिल्ले बसली निवांत, आई उभी किती वेळ!
तिच्यासाठी दिवसात, नसे कधिही अवेळ!
दाणे कमावून चोच, होई चोचीमधे रिती!
आई मूर्तिमंत त्याग, आई मूर्तिमंत प्रिती!