⚜️हिरे⚜️

 ⚜️हिरे⚜️ 

   एका व्यापारी बाजारात एक उंट विकत घेण्यासाठी फिरत होता.
एका ठिकाणी उंट निवडल्यानंतर व्यापारी आणि उंट विक्रेत्यामध्ये करार झाला आणि उंट विकत घेतला. घरी पोहोचल्यावर व्यापाऱ्याने आपल्या नोकराला उंटाचे खोगीर काढण्यासाठी बोलावले. खोगिराच्या खाली नोकराला एक लहान मखमली पिशवी सापडली ज्यात मौल्यवान हिरे व रत्ने होती. नोकर ओरडला, "मालक, ह्यात काय निघाले ते पहा"
व्यापारी आश्चर्यचकित झाला, त्याने आपल्या नोकराच्या हातात हिरे पाहिले.
व्यापारी म्हणाला: "मी उंट खरेदी केला आहे, हिरे नव्हे, मी ते त्वरित परत करतो"
व्यापाऱ्याने ताबडतोब बाजारपेठेत जाऊन मखमलीची पिशवी त्या विक्रेत्याला परत केली. उंट विक्रेता खूप खूष झाला, म्हणाला, "मी विसरलो होतो की मी माझे मौल्यवान हिरे खोगिराखाली लपवले होते. आता आपण बक्षीस म्हणून कोणताही एक हिरा घ्या"
  व्यापारी म्हणाला, "मी उंटासाठी योग्य किंमत दिली आहे म्हणून मला कोणत्याही भेटवस्तू आणि बक्षिसाची आवश्यकता नाही"
  उंट विकणारा आग्रह धरत होता. शेवटी, व्यापारी हसला आणि म्हणाला, "खरं तर मी थैली परत देण्याचा निर्णय घेतला तेव्हाच मी दोन मौल्यवान हिरे आधीच माझ्याकडे ठेवले होते."
   हे ऐकल्यानंतर नंतर उंट विक्रेता खूप चिडला आणि त्याने थैली रिकामी करून त्यातील हिरे मोजले पण जेव्हा त्याला लक्षात आले की त्याचे सर्व हिरे जसेच्या तसे आहेत अन एकही हिरा कमी झालेला नाही तेव्हा तो म्हणाला, “हे माझे सर्व हिरे आहेत, तर मग तुम्ही ठेवलेले दोन सर्वात मौल्यवान हिरे कोणते?"
"प्रामाणिकपणा आणि माझा स्वाभिमान !"
विक्रेता निःशब्द झाला. 

तात्पर्य: "प्रामाणिकपणा आणि माझा स्वाभिमान "हे दोन हिरे आपल्याकडे आहेत की नाही ह्याचा शोध प्रत्येकाने नक्की घ्यावा...