⚜️उपक्रमांचा भडीमार⚜️
उपक्रमांचा होतोय भडीमार,
मुलांना आम्ही कधी शिकवणार?
शिक्षक ऑनलाईन, प्रत्यक्ष सभेवर,
विद्यार्थी पडतो आहे वाऱ्यावर !
पुन्हा तेच उपक्रम तेच खेळ,
सगळा जातोय त्यातच वेळ !
रविवार देखील नाही सोडला,
कसा नाही यांना विसर पडला !
दिवस आहेत पावसा पाण्याचे
अतिवृष्टी , महापूर आपत्ती येण्याचे !
कधी राबवा साक्षरता अभियान,
कधी फोटो पाठवा स्वच्छता अभियान !
कधी करा शाळाबाह्य सर्वेक्षण,
कधी भरा जातवार आरक्षण !
कधी मिळवा शाळेस लोकसहभाग,
कधी बनवा शाळेत परसबाग !
कधी भरा ऑनलाईन हजेरी,
कधी रजेवर पोषण आचारी !
कधी करा सप्ताह साजरा,
रोज शिजवा पोषण आहारा !
कधी साजरा करा योगदिन,
कधी राबवा शाळेत अंडादिन !
कधी करा परिसरात वृक्षारोपन,
कधी करा प्लॅस्टिक निर्मूलन !
कधी करा मतदार जागृती,
विद्यार्थ्यांना कधी देणार ज्ञान अनुभूती ?
कधी येते निवडणूकीची ड्युटी,
कधी मिळणार या कामातून सुट्टी !
कधी करा पर्यावरणाचे रक्षण,
बंद पडत आहे मुलांचे शिक्षण !
गुरुजी, या सर्वांमधून वेळ काढ,
मग कर त्यांची गुणवत्ता वाढ !
विद्यार्थ्यांची झालेय प्रयोगशाळा,
खाजगी कंपन्यांचा शाळांवर डोळा !
आम्हांला फक्त मुलांना शिकवू द्या,
मराठी शाळा स्पर्धेत टिकवू द्या !