⚜️सुखी राहण्याचा मार्ग....⚜️

⚜️सुखी राहण्याचा मार्ग....⚜️

      एक ऋषी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे शंका निरसन करत असत. समस्येतून उपाय सांगत असत. त्यांच्याकडे आलेला कोणीही विन्मुख होऊन परतत नसे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या दुःखाची उकल करण्यासाठी त्या ऋषिंकडे येत असे.
     एक दिवस एक व्यक्ती एक प्रश्न घेऊन त्या ऋषिंच्या  भेटीस आला. ऋषिंच्या  नुसत्या दर्शनाने त्या व्यक्तीचे मन शांत झाले. 
      ही मनःशांती सातत्याने अनुभवता यावी, म्हणून त्या व्यक्तीने ऋषिंना प्रश्न विचारला, 'भगवान, आम्ही संसारी माणसं छोट्या छोट्या गोष्टींनी त्रासून जातो. 
    आम्हाला तुमच्यासारखं कायम आनंदी, कायम सुखी कसं बरं राहता येईल? कृपया मार्गदर्शन करा.'
      ऋषी त्याच्याकडे बघुन किंचित हसले. ते म्हणाले, 'यावर उपाय तुला आज नाही, उद्या देतो. उद्या सकाळी मी प्रभात फेरीसाठी जंगलात जाणार आहे, तेव्हा तू सुद्धा माझ्याबरोबर ये!'
   त्या व्यक्तीला वाटले, उचित जागी, उचित वेळी ऋषी  आपल्याला काहीतरी मंत्र सांगणार असावेत. त्याने होकार दिला आणि तो आनंदाने परतला.
    दुसऱ्या दिवशी सकाळी ठरलेल्या वेळी ऋषी फेरफटका मारायला निघाले. तेव्हा ती व्यक्ती वेळेआधीच हजर झाली आणि ऋषिः सोबत चालू लागली. 
     ऋषिः शांतपणे चालत होते. व्यक्तीच्या मनात चलबिचल सुरू होती. ऋषी तो मंत्र कधी देतील याची त्याला उत्सुकता लागली होती. 
    तेव्हा ऋषिंनी वाटेत पडलेला एक जड दगड उचलला आणि काही न बोलता त्या व्यक्तीच्या हाती दिला. त्यानेही तो निमूटपणे हातात घेतला. दोघे चालत राहिले. 
    ठराविक अंतर कापून परतीच्या मार्गाला लागले. तरीही ऋषिः काहीच बोलेना. त्याची चिडचिड होऊ लागली आणि दगड हातात धरून हात प्रचंड दुखू लागला. त्याच संयम संपला. 
    तो म्हणाला, 'भगवान, हे ओझं आणखीन उचलवत नाही. हा दगड आता खाली ठेवून देऊ का?'
   ते पाहुन ऋषी हसून म्हणाले, 'अरे, तू हातात दगड घेऊन चालतोय हे मी केव्हाच विसरलो. तुला त्या दगडाचं ओझं होत होतं, तर कधीच टाकून द्यायचंस नाही का? माझ्या सांगण्याची काय वाट बघत बसलास?'
  'पण भगवान, तुमच्या आज्ञेशिवाय मी खाली कसा ठेवणार होतो?' असे म्हणत तो मनुष्य हतबल झाला.
   त्यावर ऋषिः त्याच्याकडे बघत म्हणाले, 'अरे पण यामुळे वेदना तर तुलाच सहन कराव्या लागल्या ना? हेच तुझ्या प्रश्नाच उत्तर आहे. 
   आपण आयुष्यभर अनेक विषयांचं ओझं अकारण वाहत राहतो. त्याचा त्रास आपल्यालाच होतो. 
   आपल्याला होणाऱ्या त्रासाची दुसऱ्याला कल्पनाही नसते. त्याच्या सांगण्याची वाट पाहत न बसता, हे ओझं लवकरात लवकर टाकून देण्याची कला आत्मसात कर. मग बघ, आयुष्यभर सुखी होशील आणि आनंदीही!'
तात्पर्य :- एखाद्याच्या बोलण्याचा, वागण्याचा आपण इतका त्रास करून घेतो, मनाला लावून घेतो, परंतु ज्याच्यामुळे आपल्याला त्रास झाला, त्याच्या हे  कधिच लक्षांत येत नसतं. मग आपण तरी त्रास का करून घ्यायचा? कोणाकोणाचा त्रास करून घ्यायचा? त्रासाच्या क्षणांमध्ये सुखाचे क्षण लोप पावत जातात. आयुष्याचा भरभरून आनंद घ्या. जे ओझं त्रास देतं, ते काढून टाका. प्रवास आपोआप सोपा होत जाईल.