⚜️निदान एक तरी झाड..........🌴⚜️
पहाटेच जाग आली, कोणी टकटक करीत होते,
दार उघडून पाहिले बाहेर तर कुणीच उभे नव्हते...
आवाजाच्या दिशेने बघताच, खिडकीवर दिसला एक पक्षी,
चोचीने टकटक करीत तावदानावर उमटवीत होता नक्षी...
"का रे बाबा?" विचारले
तर म्हणाला, "भाड्याने मिळेल का एखादे झाड घरटे बांधण्यासाठी?,
एकटा कुठेही कसाही राहिलो असतो पण जागा हवी पिल्लांसाठी...
तुमच्या भाऊबंदांनी लुटले आमचे रान केले निर्वासित,
बेघर झालोच दाण्यापाण्यासाठी असतो आता फिरस्तित...
वर पुण्यं म्हणून ठेवतात गच्चीत थोडे दाणे अन पाणी,
पण निवाऱ्याचे काय? हे लक्षात घेतच नाही कुणी...
पोटाला हवेच, खातो ती भिक अन नेतो थोडे घरी,
खायला तर हवच, जरी डोक्यावर छप्पर नसले तरी...
कधीकधी वाटते करावी आत्महत्या बसुन विजेच्या तारेवर,
किंवा द्यावा जीव लोटून त्या उंच मोबाईल टाॅवरवर...
जसे मग आत्महत्ये नंतर सरकार काही देते शेतक-याला,
तसेच मिळेल का एखादं झाड, माझ्या पिल्लांना तरी आस-याला"
ऐकून मी चक्रावलो, खरचं एवढा विचार मी नव्हता केला,
जंगलतोडीत त्यांच्या घरांचा विचार कुठेच नाही झाला...
मी हात जोडून म्हटले, "त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो,
पण आत्महत्या करू नको खरचं मनापासुन सांगतो...
तोपर्यंत कुंडीतल्या रोपावर, बांध वनरुम किचन खोपा,
अडचण होईल पण आत्ता तरी एवढाच उपाय आहे सोपा..."
तो म्हणाला, "खुप उपकार होतील, पण भाडे कसे देणार?",
"रोज त्रिकाळ मंजुळ गाणी ऐकव, बाकी काही नाही मागणार..."
तो म्हणाला, "मला तुम्ही भेटलात पण बाकी नातलगांच काय?,
त्यांना पण घरट्यासाठी जागा हवी, कुठे ठेवतील पाय...?"
"अरे लावताहेत आता झाडे अन जगवतात आता कुणी कुणी,
बदलतेय चित्र हळू हळू, त्यांना सांग, आत्महत्या करू नका कुणी..."
ऐकुन तो पक्षी उडाला ,काड्या जमवायला घरट्यासाठी,
अन मी पण मोबाइल उचलला, तुम्हा सगळ्यांना हे सांगण्यासाठी...
त्याची खिडकीवरची टकटक माझ्या मनाचे उघडले कवाड,
वाचुन तुम्ही पण लावाल ना, कुंडीत वा अंगणात एकतरी झाड...🌱
निदान एक तरी झाड ........!🌴