⚜️प्रारब्ध आणि संगत..⚜️

⚜️प्रारब्ध आणि संगत..⚜️

    एका भुंग्याची शेणातल्या किड्याशी गट्टी जुळली. पुढे त्यांच्यातली मैत्री खूप गाढ होत गेली. एके दिवशी किडा भुंग्याला म्हणाला, "अरे तू माझा सर्वात आवडता आणि जवळचा मित्र आहेस तर उदया तू माझ्या घरी जेवायला ये."
     भुंगा दुस-या दिवशी तडक त्याच्याकडे गेला पण नंतर विचारात पडला की मला चुकीची संगत लाभली म्हणून आज शेण खायची सुद्धा वेळ आली. आता भुंग्याने किड्याला त्याच्या स्थळी येण्याचं आमंत्रण दिलं की तू उदया माझ्याकडे ये!..
    दुस-याच दिवशी सकाळी किडा भुंग्याकडे गेला. भुंग्याने येताच क्षणी त्याला उचलून गुलाबाच्या फुलात बसवलं.
    किड्याने परागरस चाखला.किती भाग्यवान मी!... अस म्हणून तो मित्राचे आभार मानतच होता इतक्यात शेजारच्या मंदिरातील पुजारी आला. ते गुलाब तोडलं आणि मंदिरातल्या श्रीकृष्णाच्या चरणांवर अर्पण केलं. किड्याला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं तो धन्य झाला कारण त्यांच्या पायाजवळ बसण्याचं सौभाग्य लाभलं. संध्याकाळी पुजा-याने सगळी फुलं एकत्र करून गंगेत विसर्जित केली. आता किडा स्वतःच्या नशीबावर हैराण होता. इतक्यात भुंगा उडत उडत किड्याजवळ आला आणि म्हणाला,
"भाऊ, काय चालू आहे मनात?.."
किडा म्हणाला, "बंधू, जन्मोजन्मीच्या पापांची मुक्ती झाली. प्रारब्धातून सुटलो एकदाचा!.. हे सर्व चांगल्या संगतीचं फळ आहे.
तात्पर्य :- कोणालाच जीवनाच्या कोणत्या वळणावर आपली कोणाशी गाठभेट होणार आहे याची पूर्वकल्पना नसते. प्रत्येकाशी आपलं रक्ताचं नातं असू शकत नाही म्हणून निसर्गनियमाने काही माणसं अद्भुतरित्या आपल्या जवळ येतात जसं की नदीच्या प्रवाहात वाहताना दोन ओंडके अचानक एकत्र येतात. सोबत कुठपर्यंत असेल ते काहीच निश्चित नाही पण काही काळ एकत्र प्रवास होऊन पुढे वेळ आल्यावर विलग होतात. अशी नाती खरंच अद्भुत असतात पण फक्त ती जपण्याची जाणीव आणि आस्था आपल्यात असायला हवी. नात्यांमध्ये आस्था असावी पण आसक्ती नाही कारण कोणीही सोबत जन्माला येत नसतं. आपण एकटेच जन्माला आलो आणि एकटेच जाणार हे कायम लक्षात असू द्यावं मग आसक्ती निर्माण होत नाही.
      मूळात आपला जन्म कशासाठी झाला आहे हे गूढ उकलता आलं तर पुढचा सर्वच प्रवास सुखकर होतो आणि 'ते उकलण्याचा एकमेव मार्ग ध्यानसाधना.' 
    प्रारब्धात ठरल्याप्रमाणे कोणाकडून काही घेण असेल किंवा आपण कोणाचं देण लागत असू तर वेळ आल्यावर त्या प्रत्येक जीवाच्या भेटी होतातच.