वैदिक हिंदू धर्मामध्ये औट म्हणजे साडेतीन या अंकास विशेष महत्व आहे.
एका वर्षात साडेतीन मुहूर्त :-
१) गुढीपाडवा
२) दसरा
३) दिवाळी
४) अक्षयतृतीया - (अर्धा )
भरतात साडेतीन ठिकाणी कुंभमेळे आहेत :-
१) प्रयाग
२) उज्जयनी
३) त्र्यंबकेश्वर (नाशिक)
४) हरिद्वार - ( अर्धा )
देवदैत्यांच्या दधीसमुद्रमंथनातून चौदा रत्नापैकी अमृत हे रत्न मिळाले. हा अमृताचा कुंभ गरुड नेत असताना त्यातील साडेतीन थेंब या साडेतीन ठिकाणी पडले म्हणून येथे कुंभमेळे भरतात.
ॐ हे एकाक्षरी ब्रम्ह याच्या मात्रा साडेतीन आहेत :-
देवा तू अक्षर / औटा विये मात्रेसी पार /
श्रुती जयाचे घर / गिवसीत आहाती // ज्ञाने /
प्रत्येक माणसाचा देह त्याच्या हाताने साडेतीन हात आहे. :-
या जगात प्रत्येकाची जागा फक्त साडेतीन हात आहे. थोडा विचार केला तर या देहातून जीव गेला तर आपलं काहीच नाही.
बळी राजाकडे वामन अवतारात देवाने तीन पावले जमीन मागितली :-
देवांनी एका पावलात भूमी, दुसऱ्या पावलात आकाश व तिसरे पाऊल बळीराज्याच्या डोक्यावर ठेवले. मात्र देवास स्वत:चा देह द्वारपाल म्हणून घ्यावा लागला. जसा भाव तसा देव. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात -
देह समर्पिजे देवा / भर काहीच न घ्यावा //
होईल अवघा /तुका म्हणे आनंद //
ज्ञानेश्वर महाराजांनी सहाव्या अध्यायात योगदर्शन लिहिले :-
त्यात देहामध्ये कुंडलिनी आहे.ती साडेतीन वेढ्यामध्ये वळून बसली आहे असे सांगतात.
प्रत्येक माणसाच्या शरीरावर साडेतीन कोटी केस आहेत :-
पण ते कोणी मोजण्याचा प्रयत्न करू नये.जरी आपले असले तरी. कबीर दासांचा एक डोह आहे.
चार मिले चौसष्ट खिले/ बिस रहे कर जोड
हरिजनसे हरिजन मिले / विहंसे सात करोड
जेंव्हा दोन हरिजन म्हणजे महात्मे एकमेकांना भेटतात तेंव्हा प्रथम अलिंगन देतात.त्याचे दोन हात, याचे दोन हात. एकमेकांना मिठी मारतात.चौसष्ट खिले म्हणजे दोघांची बत्तीशी दिसते. खळखळून हसतात. नंतर त्याची व याची दहा दहा बोटे नमस्कारासाठी जुळतात आणि त्याचे साडेतीन कोटी केस व याचे साडेतीन कोटी केस रोमांचित होतात.एवढा एकमेकांच्या भेटीचा आनंद होतो.
ज्ञानेश्वर महाराज महाराज दोन साधूंच्या भेटीचे वर्णन करतात .-
जैसी जवळिकीचे सरोवरे / आंबळलिया कालवाती परस्परे
मग तरंगासी धवळारे / तरंगची होती //
महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे आहेत :-
१) कोल्हापूरची महालक्ष्मी
२) तुळजापूरची तुळजाभवानी
३) माहुरगडची महाकाली रेणुकादेवी
४) वणीची सप्तश्रृंगी - ( अर्धे शक्तीपीठ )
असे हे आहे औट (साडेतीन ) अंकाचे महिमान .
म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या ओव्या साडेतीन चरणामध्ये लिहिल्या आहेत.
❃❃ संकलक ❃❃
श्री .औटी बबन मोहन
जि.प शाळा खांडवी, केंद्र- कोंभळी .
ता.कर्जत,जि.अहमदनगर
☎ ९४२१३३४४२१