⚜️यशप्राप्ती⚜️

⚜️यशप्राप्ती⚜️

      एका गावामध्ये फार मोठा दुष्काळ पडला होता. खूप दिवस अजिबात पाऊस न पडल्यामुळे लोकांनी वरुणदेवाची आराधना सुरू केली. त्या गावात वरुणदेवाला प्रसन्न करण्यासाठी एक यज्ञ करण्याचे ठरले. त्यादिवशी पुष्कळ लोक सकाळी उठून देवळाकडे निघाले. कोंडिबा शेतकऱ्याचा 'गणेश' नावाचा एक मुलगा हातात छत्री घेऊन निघाला. वाटेत त्याला एक शेतकरी भेटला. त्याने गणेशला विचारले, “काय रे लेका गण्या, आकाशात ढग नाही, पाऊस नाही, अन् मग तू ही छत्री कशाला घेतली आहेस?" त्यावर गणेश म्हणाला, “अहो काका, आकाशात ढग नाहीत हे बरोबर आहे, परंतु आता पाऊस पडण्यासाठी देवळात यज्ञ होणार आहे ना ? मग जोरात पाऊस पडेल, म्हणून मला घरी जाण्यासाठी छत्रीचा उपयोग होईल." त्या मुलाचे उत्तर ऐकून शेतकरी म्हणाला, “मुला, तुझे बरोबर आहे. तुला या यज्ञाविषयी निष्ठा, श्रद्धा आहे. अशीच श्रद्धा प्रत्येक कार्यावर ठेव."

तात्पर्य :- कोणतेही कार्य करण्यापूर्वी त्या कार्याविषयी निष्ठा, श्रद्धा व विश्वास असावयास हवा. कोणतेही कार्य श्रद्धेने केल्यास खात्रीने यशप्राप्ती होईल.