⚜️वासुदेव गीत⚜️

⚜️वासुदेव गीत⚜️

 उजळून आलं आभाळ रामाच्या पारी 
गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी

सूर्व्यासंगं ईर्षा करतोय अंधार गा अंधार 
उजेड त्येला गिळतो म्हणून बेजार गा बेजार 
पापाच्या म्होरं पुण्याई ठरतीया भारी

कोंबडा बोलतो ग कोंबडा बोलतो ग 
उगवतीच्या डोईवरी तुरा सूर्व्याचा डोलतो ग

नारायणाचं रूप खेळवी धरतीला गा धरतीला 
अन् इरसरीनं चांद चमकवी रातीला गा रातीला 
ही जिद्द कल्याणापायी असावी सारी

पाय उचला ग सयांनो, जाऊ पाण्याला बायांनो 
किस्न वाजवी पावा ग बावरल्या नारी

तुमच्या आधी पाखरं उठली घरट्यात गा घरट्यात 
गायवासरू बैल जागली गोठ्यात गा गोठ्यात 
किस्नाचं रूप हे आलं चालून दारी

नंदीराजाच्या जोडीनं मळा शिंपला शिंपला 
डोळा दीपला दीपला, आज आक्रीत घडं 
खंड्याला वडं रं बंड्याला वडं रं

भगवंतानं दान दिलं हे गावाला गा देवाला 
मूठपसा हे दान पावलं देवाला गा देवाला 
किरपेला भक्तीची जोड अशी ही न्यारी