⚜️नगरची माती.....⚜️

 ⚜️नगरची माती.....⚜️

 साधी सरळ माणसं इथली 
साधी सरळ नाती 
अभिमानाने मळवट भरावा 
अशी नगरची माती ।।धृ।।

 अहमदशहाने जरी वसवली प्रथम येथे वस्ती
 तरीही ह्या जागेचा महिमा पुराणेही गाती 
श्रीरामांच्या लंका प्रवासापर्यंत या प्रदेशाची व्याप्ती 
तुळजाभवानीचे मुळ इथलेच इतिहासतज्ञ सांगती 
साक्षात शनिदेव स्थिरावले येथे 
धन्य ती नियती 
अभिमानाने मळवट भरावा 
अशी नगरची माती ।।१।।

 मच्छिंद्रनाथ, कानिफनाथ जेथे समाद्धिस्त होती 
चांगदेवांचा कोरा कागद जेथे मुक्ताई वाचती
 "ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्ञानदेव जेथे साकारती
 "श्रद्धा और सबुरी" शिकवण साई शिकविती
विठ्ठल भक्त संताची चरित्रे
भक्तविजय,संतलीलामृत ग्रंथात भेटती 
 संत चरित्र कीर्तनात गाती
ताहराबाद गावी धन्य तो महिपती 
 मेहरबाबांच्या मौनाने सुद्धा 
भक्तगण डोलती
 अभिमानाने मळवट भरावा 
अशी नगरची माती ।।२।।

क़ुर औरंगजेबाला मिळाली इथेच मूठमाती
 चांदबिबीचे राज्य वदते स्रीशक्तिची महती
शहाजी महाराजांच्या पराक्रमाची 
आली येथे प्रचिती 
अभिमानाने मळवट भरावा 
अशी नगरची माती ।।३।।

 सिद्धटेकचा सिद्धिविनायक चतुर्थीला पूजिती
 ऋषी अगस्ती पुराणात येथे तपस्या करती 
अहिल्यादेवी होळकर जेथे माहेरा येती
 अण्णा हजारेंची प्रसिद्ध जेथे राळेगण सिद्धी
 शाहू मोडक अभिनयात 
श्रीकृष्ण जगती
 अभिमानाने मळवट भरावा 
अशी नगरची माती ।।४।।

 "MIRC सैन्यदल वाढवी नगरची ख्याती .
 VRDE वाहनांचे परीक्षण करी एकहाती
 रणगाड्यांचे म्युझियम फुलवी इंचाने छाती
 रेहकुरीच्या अभयारण्यी काळविटे धावती
 आनंदऋषींची कर्मभूमी 
नगरला म्हणती
 अभिमानाने मळवट भरावा 
अशी नगरची माती ॥५॥

 सहकाराची गंगा जेथे अहोरात्र वाहती 
कलावंतांची कला जेथे सौख्याने नांदती
 खेळाची मैदाने जेथे विजयाने गाजती
 नृत्याचे झंकार जेथे 
तालातून नाचती
 अभिमानाने मळवट भरावा 
अशी नगरची माती ।।६।।


"डिस्कव्हरी ऑफ इंडिया' नेहरू स्वहस्ते लिहीती
 टिळकांची स्वराज्य गर्जना जेथे प्रथम गर्जती
भोळाभाव, सहनशीलता करी लाभाविन प्रिती
साधी सरळ माणसं इथली 
साधी सरळ नाती
 अभिमानाने मळवट भरावा 
अशी नगरची माती ॥७॥